नागपूर : त्या दोघीही चुलत बहिणी परंतु सख्ख्या बहिणीपेक्षाही त्यांच्यामधील नाते अधिक घट्ट होते. दोघेही एकमेकींना जीवापाड जपत. परंतु एका आजारात बहिणीची किडनी निकामी झाली. मृत्यूच्या दारातून बहिणीला बाहेर काढण्यासाठी चुलत बहिणीने हिंमत बांधली. तिच्या मुलांनीही आईला बळ दिले आणि गुरुवारी तिने आपली एक किडनी दान करीत बहिणीला नवे जीवन दिले.
कपिल नगर येथील रहिवासी ५५ वर्षीय चुलत बहीण अपर्णा (बदलेले नाव) तिने ५० वर्षीय संध्या सत्रमवार हिला किडनी दान केली. प्राप्त माहितीनुसार, अपर्णा लहानपणापासूनच संध्याच्या घरी वाढली, मोठी झाली. २०१७ मध्ये संध्याला एका आजारात चेहऱ्यावर सूज आली. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी किडनी निकामी झाल्याचे निदान केले. मागील वर्षीपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर डायलिसीस सुरू होते. बहीण बरी व्हावी म्हणून अपर्णा होईल ते सर्व प्रयत्न करीत होती.
दोन महिन्यांपूर्वीच डॉक्टरांनी लवकरात लवकर किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला. अपर्णाने निर्णय घेतला. तिच्या पतीचा मृत्यू झाल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांसमोर संध्याला किडनी दान करण्याचा निर्णय सांगितला. मुलांनी आईला हिंमत दिली. डॉक्टरांनी दोघींची तपासणी केली तेव्हा दोघींचे रक्तगट जुळले. दोन आठवड्यापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट होणार होते परंतु काही कारणाने ते पुढे ढकलण्यात आले. सर्वांच्या जिवाची घालमेल होत असताना अखेर गुरुवारी यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाले. संध्याला नवे जीवन तर अपर्णाला बहिणीला मदत करण्याचे समाधान मिळाले.
- आणखी १३ किडनी रुग्ण ट्रान्सप्लांटच्या यादीत
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पीयूष किंमतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, १३ रुग्ण किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची कागदपत्रे व तपासणी अंतिम टप्प्यात आहे. यामुळे आता किडनी ट्रान्सप्लांटला वेग येईल.
- २०२०नंतर किडनी निकामी झालेल्यांच्या वाढल्या आशा
शासकीय रुग्णालयांमध्ये नागपूरचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किडनी ट्रान्सप्लांट करणारे पहिले रुग्णालय आहे. फेब्रुवारी २०१६ पासून ते फेब्रुवारी २०२०पर्यंत ६८ रुग्णांवर ‘लाइव्ह किडनी ट्रान्सप्लांट’ झाले. त्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर आज पहिले किडनी ट्रान्सप्लांट झाले. यामुळे किडनी निकामी होऊन मृत्यूचा दाढेत जगणाऱ्या रुग्णांच्या आशा वाढल्या आहेत.
- या डॉक्टरांनी घेतले अधिक परिश्रम
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. भूषण महाजन यांच्या सहकार्याने यूरोलॉजिस्ट डॉ. धनंजय सेलुकर, डॉ. महेश बोरीकर, डॉ. निखिलेश जिभकाटे, डॉ. प्रणल सहारे, डॉ. किशोर टोंगे, डॉ. वैभव नासरे, डॉ. विवेक बारेकर यांच्यासह हृदयशल्यचिकित्सक डॉ. सतीश दास, डॉ. कुणाल रामेकर, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. पीयूष किंमतकर, निवासी डॉक्टर डॉ. शेफाली जुनेजा, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर डॉ. नीलिमा राय, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. तेजस्विनी बागडे, डॉ. संजीवनी खडसे, डॉ. मेनू हबीब, डॉ. शीतल यांनी परिश्रम घेतले.