सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणी सुरक्षित व परिणामकारक ठरली. ‘सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने’ २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना लस देण्यासाठी शिफारस केली आहे. विशेष म्हणजे, संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी या लसीकरणाला सुरुवात झाल्यास लाटेला टाळता येणे किंवा गंभीरता कमी करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी मिळून तयार केलेल्या मोठ्यांच्याच ‘कोव्हॅक्सिन’लसीची २ ते १८ या वयोगटांत मानवी चाचणीला राज्यात पहिल्यांदाच नागपुरात ६ जूनपासून सुरुवात झाली. बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनात ही चाचणी २ ते ६, ७ ते ११ आणि १२ ते १८ या तीन वयोगटांत विभागण्यात आली. प्रत्येक वयोगटांत ५० मुले-मुलींचा समावेश होता. ‘०.५ एमएलचा’ पहिल्या डोसनंतर २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस देण्यात आला. त्यानंतर घेण्यात आलेल्या रक्ताच्या चाचणीत ॲण्टिबॉडीज निर्माण झाल्याचे व लस सुरक्षित असल्याचे पुढे आले. संकलित केलेला हा ‘डेटा’ ‘सीडीएससीओ’ आणि ‘सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने’ (एसईसी) चाचपणी केली. त्यानंतर सकारात्मक शिफारसी दिल्या. त्याला ‘डीसीजीआय’ची मंजुरी मिळाल्यास व सरकारने निर्णय घेतल्यास लवकरच ही लस बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.
-लहान मुलांच्या लसीकरणाची लवकरच घोषणा
१५ ऑक्टोबरपर्यंत देशात १०० कोटी लोकांचे लसीकरणाचे लक्ष्य आहे. ते शक्य झाल्यास सरकार यावर निर्णय घेऊन लहान मुलांच्या लसीकरणाची घोषणा करण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहे.
-या लसीलाही मिळाली मंजुरी
१२ वर्षांच्यावर असलेल्या मुलांसाठी ‘झायडस कॅडिला’च्या लसीला ऑगस्ट महिन्यात मंजुरी मिळाली. ही ‘डीएनए बेस’ लस आहे तर ७ ते ११ वयोगटांसाठी सिरम इन्स्टिट्यूटची ‘नोव्होवॅक्स’लसीला सप्टेंबर महिन्यातच ‘डीसीजीआय’ची मंजुरी मिळाली. येत्या काही महिन्यांत या दोन्ही लसी बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.
- पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होण्यास मदत
कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांमधील मानवी चाचणी यशस्वी ठरली. ‘सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने’ सुद्धा या लसीची शिफारस केली. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी लहान मुलांचे लसीकरण सुरू झाल्यास ही लाट रोखण्यास किंवा त्याचे गंभीर परिणाम टाळणे शक्य आहे. लसीकरणामुळे पूर्ण क्षमतेने शाळा सुरू होण्यासही मदत होईल.
-डॉ. वसंत खळतकर, बालरोग तज्ज्ञ