उमरेड : मागील काही दिवसांपासून उमरेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटरअभावी हकनाक बळी जात असल्याच्या गंभीर बाबी समोर आल्या. लोकमतने मंगळवारी ही बाब उजेडात आणत ‘उमरेड कोविड सेंटरला व्हेंटिलेटरची सुविधा द्या’, या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले. अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उमरेड नगरच्यावतीने कोविड सेंटरला ‘मिनी व्हेंटिलेटर’ सोपविण्यात आले.
लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी प्रस्तूत प्रतिनिधीला याबाबत विचारणा केली. आम्हाला व्हेंटिलेटर दान करावयाचे आहे, अशाही भावना अनेकांनी व्यक्त केल्या. याबाबत काही डॉक्टरांशी संपर्क साधला असता, व्हेंटिलेटरसाठी तंत्रज्ञांची गरज असते. भुलतज्ज्ञ आवश्यक असतो. एक विशिष्ठ यंत्रणासुद्धा लागत असते. त्यामुळे याठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा अशक्य असल्याचे मत मांडले. शिवाय व्हेंटिलेटरसाठी २४ तास देखरेख ठेवण्याचीही कसरत पार पाडावी लागते. यावर अशा ठिकाणी निदान मिनी व्हेंटिलेटर हा एक सर्वोत्तम पर्याय असल्याचीही बाब काहींनी व्यक्त केली.
दानदाते असूनही यंत्रणाच नसल्यामुळे उमरेडसारख्या मोठ्या तालुक्यात व्हेंटिलेटर सुविधा नसल्याची कैफीयत अनेकांनी मांडली. अशा परिस्थितीत उमरेड येथील डॉ. महेश सदावर्ती, डॉ. विशाल सवाईमुल आदींनी सकारात्मकता दाखवित पुढाकार घेतला. मिनी व्हेंटिलेटर हाताळू शकतो, असा विश्वास दर्शविला. तालुका संघचालक अरविंद हजारे आणि नगर संघचालक अनिल गोविंदानी यांनी कोविड केअर सेंटरशी संपर्क साधला. होकार मिळताच ‘मिनी व्हेंटिलेटर’ प्रदान केल्या गेले. यावेळी अनिल येवले, महेश ठाकरे, सचिन चट्टे, मुकूल लुले आदींची उपस्थिती होती.
व्हेंटिलेटर कामातही आले
उमरेड कोविड सेंटरमध्ये मिनी व्हेंटिलेटर सोपविल्यानंतर येथील डॉक्टरांनी गरजू रुग्णास सदर व्हेंटिलेटर लागलीच लावले. व्हेंटिलेटर देताच ते रुग्णांच्या कामातही येवू लागल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.