नागपूर : नवीन वर्ष सुरू होत असतानाच ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. आज बुधवारी उपराजधानीत आणखी तीन ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
जनुकीय चाचणीत (जिनोम सिक्वेन्सिंग) बुधवारी तीन कोरोना बाधितांना ओमायक्रॉन असल्याचे निदान झाल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ. संजय चिलकर यांनी दिली आहे. बुधवारी नव्या तीघांना ओमायक्राॅन असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बाधितांची संख्या सहा झाली आहे. हे रुग्ण एम्समध्ये उपचार घेत आहेत. पाच सहा दिवसांपूर्वी कोरोना बाधित आढळलेल्या या रुग्णांचे नमुने पुण्याला पाठवले होते. त्याचा अहवाल बुधवारी आला.
दक्षिण आफ्रिकेतील बुरकीना फासो या देशातून आलेल्या ४० वर्षीय प्रवासी हा पहिला ओमायक्राॅन बाधित निघाला होता. त्या नंतरचे ओमायक्राॅनचे तीनही रूग्ण बरे होऊन घरी गेले होते. विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी केली असता हे रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. तेव्हापासून संशयीत म्हणून ते एम्समध्ये उपचार घेत होते.
संबंधित रुग्णांच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आले असून त्यांच्या संपर्कातील इतर लोकांची ट्रेसिंग केली जात असून त्यांच्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत, असे डाॅ. चिलकर यांनी सांगितले.