नागपूर : जलसंपदा विभागातील अभियंते व कंत्राटदारांनी कोरोना महामारीत समाजऋण फेडण्यासाठी पुढाकार घेतला. अजनी वैनगंगानगरातील जलसंपदा विभागाच्या आवारात १०० खाटांचे कोरोना उपचार केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे औपचारिक ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.
देशभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून काम करायला हवे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. या केंद्रात ज्यांना विलगीकरणात राहायचे त्यांना ठेवले जाईल. काही खाटा ऑक्सिजनयुक्त राहतील. विलगीकरणात राहणाऱ्यांना चहा, नाश्ता आणि दोन वेळचे जेवण मोफत दिले जाईल. या उपक्रमात विदर्भ सिंचन विकास महामंडळ, नागपूर कॉन्ट्रॅक्टर अॅण्ड बिल्डर्स असोसिएशन ऑफ विदर्भ आणि डॉ. दंदे फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. उद्घाटनाप्रसंगी कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार मोहिते, कॉन्ट्रॅक्टर अॅण्ड बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण महाजन, माजी अध्यक्ष पवन चोखानी, बीसीके नायर, डॉ. पिनाक दंदे, डॉ. सीमा दंदे, मुख्य अभियंता डॉ. प्रकाश पवार, अधीक्षक अभियंता जयंत गवळी, राजेंद्र सोनटक्के, रोशन हटवार, प्रवीण झोड उपस्थित होते.