-लोकमत इम्पॅक्ट
नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. यामुळे जिल्ह्याच्या सीमा नाक्यांवर बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची व वाहनांची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणने पुढाकार घेतला आहे. त्या संदर्भातील आदेश मोटार वाहन निरीक्षक व गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिले आहे. विशेष म्हणजे, कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य पथकाकडून चाचणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
सावेनर तालुक्यातील केळवद जवळील सीमा तपासणी नाका, नागपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावर व सालेभट्टी (चोर) फाट्यावरील नाक्यांवर कोविड संदर्भातील तपासणी सुरू नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने १ डिसेंबरच्या अकांत ‘जिल्हा सीमेवर आओ जाओ घर तुम्हारा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. वाहनधारकांसह फिरस्त्यांचा विना मास्क संचार सुरू असल्याचे ‘रिअॅलिटी चेक’मधून समोर आले. याची गंभीर दखल आरटीओ ग्रामीण कार्यालयाने घेतली. विशेष म्हणजे, कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात या सर्व सीमा नाक्यांवर कोविड तपासणी केंद्र उभारून तपासणी केली जात होती. परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्याने व आरोग्य पथकाने तपासणीसाठी येणे बंद केल्याने दुर्लक्ष झाले होते. परंतु आता पुन्हा रुग्ण वाढत असल्याने ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला. त्यानुसार ‘आरटीओ’ने मोटार वाहन निरीक्षकांना पुन्हा त्या ठिकाणी कोविड तपासणी केंद्र उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आजपासूनच ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवासी बसची नियमित तपासणी सुरू केली आहे. या सोबतच नाक्यावर सॅनिटायझर व हात धुण्याची व्यवस्था केली आहे.
गोंदिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शिरपूर व देवरी या सीमा तपासणी नाक्यांवर परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचेही पत्रक काढण्यात आले. यात परराज्यातील प्रवाशांची आरोग्य पथकाकडून तपासणी करण्याचे, नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे व तसा अहवाल कार्यालयात सादर करण्याच्याही सूचना आहेत.