सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. शासकीय कोविड हॉस्पिटल व हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या १,७४५ खाटा रिकाम्या आहेत. अतिदक्षता विभागामधील (आयसीयू) ५२८ खाटेवर रुग्ण नाहीत. खासगीमध्येही अशीच स्थिती आहे. ९४६ ऑक्सिजन बेड व ४३८ आयसीयूच्या खाटा रिकाम्या आहेत. अर्ध्याहून जास्त कोविड हॉस्पिटल रिकामे आहेत. यावर होणारा रोजचा खर्चही निघत नसल्याने हॉस्पिटल चालविणे कठीण झाले आहे. परिणामी, काही खासगी हॉस्पिटलने कोविडच्या खाटा कमी करण्याच्या तर काहींनी खासगी कोविड हॉस्पिटल बंद करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.कोरोनाच्या प्रादुभार्वाला आठ महिन्यांचा कालावधी झाला आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने वेग घेतला. सप्टेंबर महिन्यात बाधितांच्या व मृत्यूच्या संख्येने अनेक जुने विक्रम मोडीत काढले. भयावह आकडेवारी समोर येऊ लागल्याने दहशतीचे वातावरण होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे. २,३४३ वर गेलेली रुग्णसंख्या सध्या ५०० ते ६००च्या दरम्यान आली. तर मृत्यूची संख्या ६४ वर गेली असताना सध्या ती २० ते ३०च्या दरम्यान आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यांच्या रुग्णसेवेत असलेल्या पायाभूत सोयी व मनुष्यबळावर होणारा खर्च मात्र कायम आहे. तसेच या खाटांचा इतर रुग्णांना लाभही मिळेनासा झाला आहे.३० खाटांसाठी रोज ५ लाखांवर खर्च३० खाटांचा खासगी कोविड हॉस्पिटलचा दररोजचा खर्च ५ ते ६ लाखांचा आहे. खाटांच्या तुलनेत काही ठिकाणी सध्या दहाही रुग्ण उपचाराला नाहीत. रोजच्या खचार्चा भुर्दंड सहन करावा लागत आहे.प्रशासनाच्या निर्देशानुसार कोविड हॉस्पिटल तयार केले. या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या वेतनात वाढ करावी लागली. वेगळी यंत्रणा व सोयी उभ्या कराव्या लागल्या. आता सध्याच्या स्थितीत फार कमी रुग्ण आहेत. त्या तुलनेत रोजचा खर्चही निघत नाही आहे.-डॉ. अनुप मरारसमन्वयक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनधोका टळलेला नाही...मागील १०-१५ दिवसांत रुग्ण व मृत्यूची संख्या नक्कीच कमी झाली आहे. परंतु धोका टळला असे म्हणता येणार नाही. यामुळे शासकीय किंवा कोविड हॉस्पिटलमधील खाटा कमी करणे किंवा बंद करणे योग्य होणार नाही. यावर शासन निर्णय घेईल. पुढील दिवस सण, उत्सवाचे आहेत. यामुळे प्रत्येकाने मास्क घालणे, सॅनिटायझेशनचा वापर करणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.-जलज शर्माअतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका