नागपूर : कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी जून महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना व ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना ‘प्रिकॉशन’ डोस देण्याची घोषणा सोमवारी केली. १६ मार्चपासून या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात जवळपास ३ लाख ८ हजार ७८२ मुलांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ते वाढताना दिसून आले आहे. तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचे ‘म्युटेशन’ लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु ही लाट सौम्य ठरली. यात मुलांची संख्या एक टक्क्यांहून कमी होती असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु भविष्यात अशा लाटा येतच राहणार आहेत. कानपूर आयआयटीमधील संशोधकांनी जून-जुलैमध्ये चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. यामुळे लहान मुलांचे लसीकरण व ६० वर्षांवरील ज्येष्ठांना ‘प्रिकॉशन’ म्हणजे बूस्टर डोस महत्त्वाचा मानला जात आहे.
-१५ ते १७ वयोगटात ६१ टक्के मुलांनी घेतला पहिला डोस
कोरोनाविरुद्धच्या लसीकरणात ३ जानेवारीपासून सुरू झालेल्या १५ ते १८ वयोगटातील लसीकरणात आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील ६१.५६ टक्के मुलांनी पहिला, तर ३७.९३ टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला. हा डोस कोव्हॅक्सिनचा होता. तर याच दरम्यान हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि कोमॉर्बिडीटी असलेल्या ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी प्रिकॉशन डोस द्यायला सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण ९१ हजार १३२ लोकांनी कोव्हॅक्सिन व कोविशिल्डचे ‘प्रिकॉशन’ डोस घेतले आहेत.
- लहान मुलांमध्ये नागपुरात झाल्या या मानवी चाचण्या
सप्टेंबर २०२० मध्ये भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लसीची १२ ते ६५ वयोगटात मानवी चाचणी झाली. जून २०२१ मध्ये याच लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांची मानवी चाचणी वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनात झाली. यात १४० मुलांचा समावेश होता. या लसीचे कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याने व अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात ॲण्टिबॉडीज निर्माण झाल्याचे दिसून आले होते. यामुळे १५ ते १७ वयोगटात याच लसीचा वापर करण्यात आला. याशिवाय, नागपुरात ५ ते १८ वयोगटात ‘कोरबेव्हॅक्स’ लसीची मानवी चाचणी नागपूरच्या मेडिकलमध्ये झाली. ही लसही सुरक्षित असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.