लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कोविड-१९ नियंत्रणासाठी लस तयार करून चाचण्या सुरू आहेत. कोविड लस तयार झाल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य सेवक, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यासाठी त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा डेटाबेस तयार करण्याचे काम महापालिका करणार आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे दिशानिर्देश जारी केले आहेत. शासन आदेशानुसार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्व रुग्णालय, इस्पितळे, दवाखान्यांना माहिती देण्यासाठी पत्र दिले आहे.
नागपुरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांची माहिती संकलित करून केंद्र आणि राज्य सरकारला सादर करायची आहे. सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे सेवा देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती ई मेलवर बुधवारी २८ ऑक्टोबर पर्यंत सादर करावयाची असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष रुग्णालये, महापालिकेचे दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी कॉर्पोरेट हॉस्पिटल, खासगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नर्सिंग होम यांच्यासह शहरातील सर्वच नोंदणीकृत व अन्य रुग्णालयांनीसुद्धा आपली माहिती सादर करणे अनिवार्य आहे.
यासाठी नोडल अधिकारी म्हणून डॉ. प्रवीण गंटावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती मनपाद्वारे पाठविण्यात आलेल्या आदेशासह दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार पाठवावयाची आहे.