माैदा : शेतात गुरे चारत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने हल्ला चढविला. त्यात गुराखी जखमी झाला. ही घटना माैदा तालुक्यातील निहारवाणी शिवारात गुरुवारी (दि. ३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
रतिराम चौधरी, रा. निहारवाणी, ता. माैदा असे जखमी गुराख्याचे नाव आहे. रतिराम नेहमीप्रमाणे निहारवाणी शिवारात गुरे चारायला घेऊन गेला हाेता. गुरे चारा खात असताना ताे गुरांजवळ उभा हाेता. त्यातच जवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्याच्यावर हल्ला चढविला. यात त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. ही बाब लक्षात येताच तिलकचंद दंडारे व इतर शेतकऱ्यांनी त्याला रानडुकराच्या तावडीतून साेडविले व उपचारासाठी खात (ता. माैदा) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. या भागात वन्यप्राण्यांचा वावर प्रचंड वाढल्याने वन विभागाने त्यांचा तातडीने याेग्य बंदाेबस्त करावा तसेच रतिरामला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.