लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दारू पिण्यासाठी १०० रुपये दिले नाही म्हणून एका दारूड्याने डोक्यावर वीट मारून एकाला जबर जखमी केले. खेकडा ऊर्फ सुनील दयाराम कोटांगळे (वय ४७, रा. संजय गांधीनगर) असे आरोपीचे तर विलास झिबाजी तुरुडकर (वय ४८, कांजी हाऊस चाैक) असे जखमीचे नाव आहे.
खेकडा रिकामटेकडा असून त्याला दारूचे व्यसन आहे. तो त्यासाठी काहीही करायला तयार असतो. विलास तुरूडकर शुक्रवारी रात्री ७.३० च्या सुमारास राणी दुर्गावती चाैकात उभे असताना खेकडा त्यांच्याजवळ आला. त्याने तुरूडकर यांना दारू पिण्यासाठी १०० रुपये मागितले. तुरुडकरने नकार देताच खेकडाने बाजूची वीट उचलून त्यांच्या डोक्यावर मारली. त्यामुळे तुरूडकर जबर जखमी झाले. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली त्यांनी खेकड्याला चोप दिला. पोलिसांनाही कळविले. तुरुडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपी खेकडाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---