नागपूर : रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याची संधी साधून अवैध मार्गाने ई तिकिट मिळवणाऱ्या आणि नंतर त्याची काळाबाजारी करून प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या दलालांविरुद्ध दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या १५ दिवसांत ठिकठिकाणच्या १३ दलालांना दणका देऊन त्यांच्याकडून जुन्या-नव्या रेल्वे तिकिट, आणि ईतर साहित्य असा एकूण सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे प्रवाशांची गर्दी सारखी वाढतच आहे. त्यामुळे बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षित तिकिट मिळेनासे झाले आहे. दुसरीकडे दलाल आपले जुगाड करून अवैध मार्गाने ई तिकिटा मिळवून त्याची काळाबाजारी करीत आहेत. रेल्वेच्या खिडकीवर किंवा संकेतस्थळावर आरक्षित तिकिट मिळत नाही. मात्र,दलालांकडे गेल्यास सहज आरक्षित तिकिट मिळते. एका तिकिटावर दलाल प्रवाशांकडून ३०० ते ७०० रुपये जास्त घेतात, अशी स्थिती असल्याने रेल्वे प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्या ध्यानात घेता आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आरक्षित तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्या दलालांविरुद्ध विशेष कारवाईची मोहिम राबविण्याचे आदेश आपल्या ठिकठिकाणच्या पथकांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, १ मे ते १३ मे २०२४ या कालावधीत १३ दलालांकडे छापे टाकून त्यांना अटक करण्यातर आली. त्यांच्याकडून १८३०४ रुपयांच्या ८ नवीन तर, २ लाख, ३ हजारांच्या १५९ तिकिट जप्त करण्यात आल्या. या तिकिटा मिळवण्यासाठी दलालांनी वापरण्यात आलेले कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल तसेच अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे. स्टेशन निहाय पकडण्यात आलेले दलालआरपीएफने स्टेशन निहाय पकडण्यात आलेले दलाल पुढील प्रमाणे आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस, ईतवारी रेल्वे स्थानक नागपूर २ दलाल, मोतीबाग नागपूर १, भंडारा २, गोंदिया १, डोंगरगड १, नैनपूर ३ आणि छिंदवाडा ३ दलाल. प्रवाशांनी दलालांकडे जाऊ नयेप्रवासी दलालांकडून तिकिटा घेतात म्हणून ते काळाबाजारी करतात. प्रवासी दलालांकडे गेलेच नाही तर दलाल तिकिटांची काळाबाजारी करणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी दलालांकडे जाण्याऐवजी रेल्वे काउंटर किंवा संकेतस्थळावरून तिकिटा घ्याव्या, असे आवाहन सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी केले आहे.