नागपूर : वाराशिवनीवरून रेल्वेद्वारे इतवारी स्टेशनला पाेहचलेल्या एका वेडसर तरुणाला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली केले. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफचे उपनिरीक्षक के.के. निकाेडे व आरक्षक विवेक कनाेजिया, सचिन राऊत, गाेपाल प्रसाद हे इतवारी स्टेशनवर गस्त घालत असताना बूकिंग काऊंटरजवळ गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास एक तरुण भेदरलेल्या अवस्थेत दिसून आला. विचारपूस केली असता, त्याचे नाव खेम शिखर राऊत (२६) असल्याचे व ताे वाराशिवणी, बालाघाट येथील असल्याचे लक्षात आले. वाराशिवणीत भटकताना स्टेशनवर आल्याची माहिती त्याने सांगितली. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे बाेलताना लक्षात आले. त्याला इतवारी आरपीएफ पाेस्टवर आणून वाराशिवणी पाेलिसांना संपर्क करण्यात आला. पाेलिसांनी त्याच्या बेपत्ता असल्याची रिपाेर्ट नाेंदविली असल्याचे सांगितले. रिपाेर्टनुसार वडील सुंदरलालने खेम शेखरची मानसिक स्थिती सहा वर्षांपासून ठीक नसल्याचे नाेंदविले आहे. माहिती मिळताच वडील सुंदरलाल आरपीएफ पाेस्टला पाेहोचले व आधार कार्ड व इतर ओळखपत्र दाखवून खेम शिखर मुलगा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. संपूर्ण कारवाई मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
इतवारी स्टेशनवर मिळाला वेडसर तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:08 AM