लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणाने महाराष्ट्रात गंभीर रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत केवळ कायदे व दंड करून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी आरोग्य साक्षरता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील आरोग्य संदर्भातील वस्तुस्थितीचा नकाशा तयार करण्यासाठी, नेमकी स्थिती स्पष्ट होण्यासाठी, पर्यायाने महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी करायची आहे. महाराष्ट्राला आरोग्य साक्षर करणाऱ्या या मोहिमेत प्रत्येक घटकाने हिरिरीने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.नागपूर विभागातील पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीला नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते.सर्व जिल्ह्यातील या मोहिमेबद्दलची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून कोरोनाविषयक आलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील ‘थँक यू आशाताई’ मोहीम राज्यव्यापी राबवणारयावेळी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘थँक यू आशाताई’ मोहिमेला राज्यव्यापी करण्याबाबतचे निर्देश दिले. प्रत्येक जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या प्रयोगाला राज्यव्यापी करण्यात यावे, प्रतिबंधात्मक उपाय योजनासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी मोहीम राबविण्यात यावी, सण-उत्सव यासाठी नागरिक बाहेर पडणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.