जिल्हा नियोजन समिती : मनपा -नासुप्रला पालकमंत्र्यांच्या सूचनानागपूर : नागपूर सुधार प्रन्यास व महापलिकेने झुडपी जंगलात असलेल्या आपापल्या जागा सोडवून घेण्यासाठी वनहक्क कायद्याप्रमाणे तातडीने आपापले प्रस्ताव सादर करावेत. यासाठी येत्या १५ दिवसात प्रस्ताव तयार करा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. दलित सुधार वस्ती योजना पुढील वर्षी मनपातर्फे दलित सुधार वस्ती योजना ही नागपूर सुधार प्रन्यासमार्फतच राबविली जात असल्याबाबत महापौर प्रवीण दटके यांनी आक्षेप घेतला. तत्कालीन पालकमंत्र्यांमुळे ही योजना नासुप्रतर्फे राबविली जाते. ती महापालिकेमार्फत राबविली जावी, अशी मागणी त्यांनी केली. पालकमंत्र्यांची त्यांची मागणी मान्य करीत पुढच्या वर्षीपासून या योजनेसाठी महापालिकेने प्रस्ताव द्यावे, त्यांना अनुदान दिले जाईल. शासन आदेश असल्यास ते बदलविण्यासंबंधी प्रयत्न केले जातील, असेही सांगितले. मेडिकलमधील ट्रामा केअर युनिट महिनाभरात सुरू होणार मेडिकलमधील ट्रामा केअर युनिट येत्या महिनाभरात सुरू होईल, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. पालकमंत्र्यांनी यासंदर्भात विचारणा केली असता डॉ. निसवाडे यांनी सांगितले की, ट्रामा केअर युनिटबाबत अनेक समस्या आहेत. निधी व स्टाफची समस्या आहे. इमारतीचे हस्तांरणसुद्धा अद्याप झालेले नाही, स्टाफबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. येथे ९० बेडची मंजुरी आहे. त्यापैकी ३० बेडचे काम महिनाभरात सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर नागपुरातील आयटीआयचे सर्व ट्रेड सुरू होणार उत्तर नागपुरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा(आयटीआय)ची इमारत बांधून आहे. येथे १२ ट्रेड मंजूर आहेत. परंतु त्यापैकी केवळ दोनच ट्रेड सुरू आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होते. तसेच परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, याकडे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी लक्ष वेधले. यावर पालकमंत्री बावनकुळे यांनी येथील सर्व १२ ट्रेड सुरू करण्यास मंजुरी प्रदान केली जाईल. याबाबतचा प्रस्ताव घेऊन बुधवारी मुंबईला यावे, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच आयटीआय परिसरातील अस्वच्छता दूर करावी, असे निर्देशही दिले. मुस्लीम समाजभवन पूर्ण होणार उत्तर नागपूर येथील मुस्लीम समाजभवन आणि गुरू गोविंद स्टेडियमचे काम रखडले असल्याकडे असलम शेख यांनी लक्ष वेधले. ते काम तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. (प्रतिनिधी)
झुडपी जंगलातील जागेबाबत १५ दिवसात प्रस्ताव तयार करा
By admin | Published: February 02, 2016 3:14 AM