नागपूर : राज्यातील कारागृहांमध्ये तृतीयपंथी कैद्यांसाठी स्वतंत्र बराक तयार केले जावे, यासाठी नागपूर येथील तृतीयपंथी उत्तमबाबा सेनापतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात गृह विभागाच्या सचिवांना नोटीस बजावून यावर येत्या ११ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रोहित देव व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उत्तमबाबा हा तृतीयपंथी चमचम गजभिये याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी आहे. ही घटना जून-२०१९ मध्ये घडली होती. त्यानंतर उत्तमबाबाला सुरुवातीला नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये पुरुष कैद्यांच्या बराकीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, पुरुष कैदी शारीरिक-मानसिक छळ व लैंगिक अत्याचार करतात, असा खळबळजनक आरोप उत्तमबाबाने केला होता. त्यामुळे त्याला १७ जून २०२१ रोजी अकोला जिल्हा कारागृहात स्थानांतरित करण्यात आले. परंतु, तेथेही त्याला पुरुष कैद्यांसोबत ठेवण्यात आले आहे. ते कैदीसुद्धा छळतात, असे उत्तमबाबाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. स्वतंत्र बराकीवर निर्णय होईपर्यंत महिला कैद्यांच्या सेलमध्ये ठेवण्यात यावे, अशी मागणीदेखील त्याने केली आहे. उत्तमबाबातर्फे ॲड. सोनिया गजभिये यांनी बाजू मांडली.