लाेकमत न्यूज नेटवर्क
टाकळघाट : गावात व परिसरात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असून, बहुतेकांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. काही रुग्ण मनसाेक्त फिरत असून, काहींकडे विलगीकरणाची साेय नाही. त्यामुळे संक्रमण वाढत असल्यने गावात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करावे तसेच स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्राला राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवांतर्गत रुग्णवाहिका मिळवून देण्याची मागणी नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी संदीप उमाटे यांच्याकडे साेपविलेल्या निवेदनात केली आहे.
बुटीबाेरी एमआयडीसीमुळे टाकळघाट (ता. हिंगणा) व परिसरातील गावांमध्ये माेठ्या प्रमाणात कामगार वास्तव्याला आहेत. या भागातील लाेकसंख्येची घनता अधिक असून, कामगार राेज कामावर जातात. शिवाय, बाहेरून येणाऱ्या नागरिकांचा वावरही अधिक आहे. त्यामुळे या भागात काेराेना संक्रमणाचा वेग असून, १०० नागरिकांमध्ये काेराेनाचे किमान ६० रुग्ण आढळून येत आहेत. यातील बहुतांश जण किरायाने छाेट्या घरांमध्ये राहत असल्याने ते इच्छा असूनही जागेअभावी गृहविलगीकरणात राहू शकत नाही. त्यामुळे एका संक्रमित व्यक्तीसाेबतच त्याचे संपूर्ण कुटुंब संक्रमित हाेत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.
ही समस्या साेडविण्यासाठी गावात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करणे आवश्यक आहे. संक्रमण राेखण्यासाठी गावाचे ग्रामपंचायतमार्फत सॅनिटायझेशन करावे. काेराेना रुग्णाला श्वास घ्यायला त्रास झाल्यास त्यांच्यासाठी ऑक्सिजनची सुविधा व त्यांना शहरातील रुग्णालयात हलवण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका असावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. शिष्टमंडळात किशोर गंधारे, ललित कावळे, राकेश भगत, प्रशांत वासाड, तेजस बघणे, अविनाश बिबटे, क्षितिज धनविजय, दिनेश बजाईत, शुभम राऊत, अक्षय खंडारे, महेश दास, सुमित झाडे, अक्षय गुंडरे यांचा समावेश हाेता.