नरेश डोंगरे
नागपूर : ‘चार भिंतींच्या आड’ होणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करा. काय अडचणी आहेत त्या सांगा, पाहिजे त्या सुविधा पुरवू, मात्र महिला, मुलींच्या अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांकडे रूटिन अँगलने बघू नका. ठोस ॲक्शन प्लॅन तयार करा, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विदर्भातील तीन परिक्षेत्र तसेच दोन पोलीस आयुक्तालयात कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
गृहमंत्री वळसे पाटील गुरुवारी रात्री नागपुरात आले. शुक्रवारी सकाळी त्यांनी नागपूर तसेच गडचिरोली परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तर सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून गुन्ह्याचा आढावा घेतला. शनिवारी सकाळी अमरावती गाठत त्यांनी अमरावती परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांचा आढावा तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती जाणून घेतली. चारही बैठकांमध्ये सादर केलेल्या गुन्ह्यांच्या तुलनात्मक आकडेवारीवर टिप्पणी करताना आकड्यांचा खेळ माझ्यासमोर नको, अशी जाणीव त्यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. दोन्ही दिवसांच्या बैठकांमध्ये महिला -मुलींवरील अत्याचारांच्या प्रकरणांवरच त्यांचा फोकस होता. अशा गुन्ह्यांच्या संबंधाने राज्य सरकार कमालीचे संवेदनशील असल्याचे विदर्भातील पोलीस अधिकाऱ्यांच्या ध्यानात आणून दिले.
अनेक अत्याचार प्रकरणांतील आरोपी पीडितेच्या ओळखीचे, संपर्कातील किंवा नात्यातील असतात. हे वास्तव अधोरेखित झाल्यानंतर ‘चार भिंतीच्या आड’ होणारे गुन्हे म्हणून त्याकडे बरेचदा डोळेझाक केली जाते. यापुढे असे झाले तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचा गर्भित इशारा त्यांनी दोन्ही ठिकाणच्या बैठकांमध्ये अत्यंत शांतपणे संबंधित अधिकाऱ्यांना दिला. अत्याचार चार भिंतीआडचा असो की बाहेरचा, तो रोखता कसा येईल, यासंबंधाने नुसती चर्चा नको. गंभीर विचार करा. त्यासाठी स्ट्रॅटेजी अथवा ॲक्शन प्लॅन तयार करा. पाहिजे तर महिलांशी संबंधित गुन्ह्यांसाठी एक स्वतंत्र पोलीस ठाणेच निर्माण करा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटले. गुन्हे घडणारच नाहीत यासाठी सतर्कता बाळगा आणि गुन्हे घडले तर संवेदनशीलपणे त्याचा तपास करा, असा सल्ला देऊन त्यांनी महिला-मुलींशी संबंधित अत्याचार प्रकरणात चालढकल करणाऱ्या कोणत्याच अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, असा गर्भित इशाराही दिला.
एसडीपीओ, पीएसआयची कमतरता
नागपुरात विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार तर अमरावतीत विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आणि पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्याशी चर्चा करताना या दोन दिवसांत गृहमंत्री वळसे पाटील यांनी काय अडचणी आहेत, कोणत्या सुविधा हव्यात हेदेखील जाणून घेतले. चारही बैठकात एसडीपीओ तसेच पीएसआयची कमतरता अधोरेखित झाली. ही रिक्त पदे लवकरच भरल्या जाणार असल्याचे त्यांनी संकेत दिले.
-----
----