लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कर्ज प्रकरण तयार करून दुसऱ्याच्या नावाने परस्पर चार लाखांचे कर्ज उचलणाऱ्या एका टोळीचा लकडगंज पोलिसांनी छडा लावला. या टोळीतील निशिकांत देवराव धारकिने (वय ३२, रा. हुडकेश्वर) आणि अनुप राधेश्याम जयस्वाल (वय २७, रा. आनंदनगर, सक्करदरा) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांचा पाच दिवसांचा पीसीआर मिळवण्यात आला आहे.संकटमोचन राजकुमार गुप्ता (वय ४१) हे रेणुकानगर, भवानी मंदिर पारडी परिसरात राहतात. ते एका मिष्ठान्न कंपनीत कार्यरत आहेत. त्यांचे एचडीएफसी बँकेच्या वर्धमाननगर शाखेत खाते आहे. आरोपी निशिकांत धारकिने स्वत: सीए अन् वकील असल्याचे सांगतो तर जयस्वाल याचे बांधकाम मटेरियल पुरविण्याचे काम आहे. या दोघांनी बँकेतील आपल्या अधिकारी मित्रांसोबत संगनमत करून १८ जानेवारी ते ३० जानेवारी २०१८ दरम्यान गुप्ता यांच्या बँक खात्याची आॅनलाईन माहिती प्राप्त केली आणि त्याआधारे त्यांच्या नावे कर्ज प्रकरण सादर केले. तीन लाख ९६ हजारांचे कर्ज मिळवून ती रक्कमही हडपली. दरम्यान, बँकेतून आपल्या नावाने कर्ज उचलले गेल्याची माहिती गुप्ता यांना कळली. त्यांनी लगेच बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वात एएसआय ईश्वर पोतदार यांनी तपास केला. धारकिने आणि जयस्वाल यांनी हे बनावट कर्ज प्रकरण सादर करून रक्कम लाटल्याची माहिती उघड होताच, त्या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करून त्यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली.आणखी अनेकांना होणार अटकसूत्रांच्या माहितीनुसार, दुसऱ्यांच्या नावे असे बनावट कर्ज प्रकरण सादर करून परस्पर लाखो रुपये उचलणाऱ्या या टोळीत अनेक सदस्य असून, त्यातील काही जण बँकेशी जुळले आहेत, असे समजते. अटकेतील धारकिने आणि जयस्वाल यांनी अनेकांची नावे घेतली असून, त्यांनाही पुढच्या काही तासात अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
बनावट कर्ज प्रकरण तयार करून परस्पर लाखांचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 10:43 PM
बनावट कर्ज प्रकरण तयार करून दुसऱ्याच्या नावाने परस्पर चार लाखांचे कर्ज उचलणाऱ्या एका टोळीचा लकडगंज पोलिसांनी छडा लावला.
ठळक मुद्देटोळीचा भंडाफोड : दोघांना अटक : पाच दिवसांची कोठडी