नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीचे गुजरातमधील भुज येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या इतर विषयांसोबतच या बैठकीत श्रीराममंदिर प्रतिष्ठापना समारंभावर मंथन होईल. २२ जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या सोहळ्यानिमित्त देशभरात वातावरणनिर्मिती करून गावागावांमध्ये अयोध्येसारखेच चित्र निर्माण करण्यावर संघाचा भर राहणार आहे.
संघाच्या नियमित वेळापत्रकानुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक होत असते. या बैठकीला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, ४५ प्रातांचे संघचालक, कार्यवाह तसेच प्रांत प्रचारक उपस्थित राहतील. सोबतच संघ परिवारातील काही संघटनांचे निवडक संघठनमंत्रीदेखील सहभागी होतील.
बैठकीत संघाच्या एकूण कार्यविस्तारावर चर्चा होईल. तसेच सप्टेंबर महिन्यात पुण्यात झालेल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीत आलेले विषय तसेच विजयादशमी उत्सवात नागपुरात सरसंघचालकांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अंमलबजावणीच्या आराखड्यावरदेखील चर्चा होईल, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनिल आंबेकर यांनी दिली आहे.
यंदाच्या बैठकीला महत्त्वपुढील वर्षी संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे मार्च महिन्यात नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा निवडणूकांअगोदरची ही अखेरची कार्यकारिणी बैठक असेल. त्यामुळे या बैठकीला महत्त्व आले आहे.