लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (वानाडोंगरी) : शिक्षण, संशोधन आणि कल्पकता (नवउपक्रम) हा यशाचा टप्पा आहे. मानवी जीवन एक प्रयोग शाळा आहे. संशोधन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याला कल्पकतेची जोड दिल्यास जग जिंकणे शक्य असल्याचा मंत्र आयसीटी मुंबईचे कुलपती पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी दिला.स्व.दादासाहेब काळमेघ यांच्या ८५ व्या जयंती वर्षानिमित्त २०१७-१०१८ या वर्षांसाठी दिला जाणारा पद्मविभूषण प्रा.डॉ.एम.एम.शर्मा उत्कृष्ट संशोधन (विद्यार्थी गट) पुरस्कार सोहळा शनिवारी वानाडोंगरी येथील स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ.माशेलकर यांनी दंतचिकित्सा क्षेत्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.ज्येष्ठ संशोधक पद्मविभूषण डॉ.एम.एम.शर्मा,आयसीटी मुंबईचे कुलगुरु पद्मश्री डॉ.जी.डी.यादव, स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.शरद काळमेघ, काँग्रेस नेते अनंतराव घारड, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक आणि प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे, संजय चौगुले, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय पाटील याप्रसंगी उपस्थित होते.डॉ.माशेलकर यांनी संशोधनात मूल्य जोपासण्याचे आवाहन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना केले. एका पिढीने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचे ध्येय ठेवले तर यानंतरची पिढी अमेरिकेत मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीत नोकरी करण्याचे ध्येय निश्चित बाळगते. तिसरी पिढी याच कंपनीचा सीईओ होण्याची आकांक्षा ठेवते तर चौथी पिढी अशाप्रकराची कंपनी स्वत:चा साकारण्याचा संकल्प करते. शेवटी यासाठी संशोधनात्मक कौशल्य उराशी बाळगणे गरजेचे असते. कठीण परिश्रम आणि संयम या यशाचा मंत्र असल्याचे माशेलकर यांनी सांगितले.डॉ.जी.डी.यादव म्हणाले, नागपुरात नेहमीच चांगल्या कल्पना विकसित होतात. जगाची आणि समाजाची गरज लक्षात घेत संशोधकांनी काम करणे गरजेचे आहे. डॉ.एम.एम.शर्मा म्हणाले, ज्ञान प्रत्येकाला असते. मात्र ते विकसित करून संशोधात्मक पातळीवर प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.डॉ.शरद काळमेघे म्हणाले, भारतात गतवर्षी ६० हजार पेटंटची नोंद झाली तर अमेरिकत हे प्रमाण ३० लाख होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या पातळीवरच विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. याच उदात्त हेतूने उत्कृष्ट संशोधानासाठी महाविद्यालयाच्या वतीने उत्कृष्ट संशोधक शिक्षक आणि विद्यार्थी असे दोन पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत. पुढील वर्षांपासून विद्यार्थी गटात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर हा पुरस्कार देण्याची घोषणा काळमेघ यांनी याप्रसंगी केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अधिष्ठाता डॉ.संजय पाटील यांनी केले.सुमीत शेंडे, श्वेता सिंग यांचा गौरवमहाविद्यालयाच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा पद्मविभूषण डॉ.एम.एम.शर्मा उत्कृष्ट संशोधन पुरस्कार (विद्यार्थी गट) डॉ.सुमित शेंडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १ लाख ११ हजार १११ रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबत विद्यापीठ पातळीवर सर्वाधिक गुण पटाकविणाऱ्या श्वेता सिंग हिला १ लाख रुपयांच्या विशेष पुरस्काराने याप्रसंगी गौरवान्वित करण्यात आले.