नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनावरून खाली पडलेल्या एका शिक्षकाला ट्रक चालकाने चिरडले. या अपघातात शिक्षकाची मुलगीही जखमी झाली. हा अपघात बुधवारी दुपारी उमरेड रोडवर घडला. नवलकिशोर प्रसाद सिंह (४३) रा. रामकृष्णनगर मृत शिक्षकाचे नाव आहे. ते सीए विद्यार्थ्यांच्या कोचिंग क्लासमध्ये शिकवित होते. जखमी मुलगी १९ वर्षीय चारुल रामदेवबाबा इंजिनियर कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला शिकते. चारुल कॉलेजच्या बसने ये-जा करते. उमरेड रोडवर ती बसमधून उतरते. तेथून ती वडिलांसोबत पायी किंवा वाहनाने घरी जाते. बुधवारी दुपारी २.४५ वाजता नवलकिशोर सिंह मुलीला स्कुटीने घरी घेऊन जात होते. पंचवटी वृद्धाश्रमसमोर पाण्याने भरलेल्या खड्ड्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात त्यांचे स्कुटीवरील नियंत्रण सुटले आणि ते स्कुटीसह खाली पडले. एका बाजूला सिंह तर दुसऱ्या बाजूला मुलगी पडली. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकने (एमएच/४०/ए.के./३८८०) सिंह यांना चिरडले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. चारुलला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह फळून गेला. मृत सिंह यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगी चारुल आणि १५ वर्षाची मानसी आहे. मानसी दहावीची विद्यार्थिनी आहे. या अपघातासाठी मनपाचा निष्काळजीपणा सुद्धा जबाबदार आहे. मनपा आणि नासुप्र अधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
खड्ड्याने घेतला शिक्षकाचा जीव
By admin | Published: September 22, 2016 2:56 AM