काटोल : वडिलांसाठी बॉटलमध्ये पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या सख्ख्या दोन भावांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना हातला शिवारात शुक्रवारी घडली. रात्रीच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे शोककळा पसरली.करण कैलास बुढाये (१०) आणि अरुण कैलास बुढाये (८) दोघेही रा. जुन्नारदेव, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश ह.मु. हातला अशी मृत बालकांची नावे आहेत. या मुलांचे वडील कैलास बुढाये हे हातला येथील उत्तम फिस्के यांच्याकडे सालदार म्हणून काम करतात. शुक्रवारी ते जनावरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. तेथे जेवणाचा डबा पोहोचविण्यासाठी करण आणि अरुण गेले होते. दरम्यान, वडिलांसाठी पाणी आणून देण्यासाठी बॉटल घेऊन पाझर तलावाकडे गेले. तेथे त्यांचा तोल गेल्याने ते दोघेही खोल पाण्यात बुडाले. बॉटलमध्ये पाणी भरून आणण्यासाठी गेलेली मुले एक तास होऊनही परत न आल्याने त्यांचे वडील कैलास बुढाये व शेतमालकांनी शोधाशोध केली. अशात त्यांना तलावाच्या काठावर चप्पल दिसली. त्यावरून मुले तलावात बुडाली असावी, अशी शंका निर्माण झाली. ही बाब गावातील नागरिकांना कळताच घटनास्थळी ग्रामस्थ धावून आले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अखेर रात्री ८ वाजताच्या सुमारास दोघांचेही मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले. काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात शनिवारी दोघांच्याही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांचे स्वाधीन करण्यात आले. कैलास बुढाये हे कामाच्या शोधात चार महिन्यांपूर्वीच हातला येथे फिस्के यांच्याकडे सालदार म्हणून कामावर आले होते. अशात ही घटना घडली. एकाच वेळी दोन मुलांच्या मृत्यूने बुढाये कुटुंबीयांवर शोककळा पसरली. याबाबत काटोल पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास ठाणेदार दिगंबर चव्हाण करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाण्यासाठी गेला सख्ख्या भावंडांचा जीव
By admin | Published: September 18, 2016 2:23 AM