लोकमत न्यूज नेटवर्कनांद : थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगावर शाल ओढून दळण दळत असताना शालीचा कोपरा आटाचक्कीच्या ‘बेल्ट’मध्ये अडकला आणि त्यासोबतच चक्कीचा मालकही आटाचक्कीच्या चाकात अडकला. त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही विदारक घटना भिवापूर तालुक्यातील नांद नजीकच्या धामणगाव (गवळी) येथे शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.रवींद्र खटू सापेकर (३५, रा. धामणगाव - गवळी, ता. भिवापूर) असे मृताचे नाव आहे. रवींद्र हा गावात आटाचक्की चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. ग्रामीण भागात सध्या २४ तास वीजपुरवठा केला जात असला तरी यातील १२ तास हा थ्री फेज आणि १२ तास सिंगल फेज वीजपुरवठा केला जातो. धामणगाव (गवळी) येथे पहाटे ५ वाजतापासून सकाळी १० वाजेपर्यंत थ्री फेज वीजपुरवठा केला जात असल्याने रवींद्रने थ्री फेज वीजपुरवठा सुरू होताच आटाचक्की सुरू केली. शिवाय, सकाळी थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांने स्वत:च्या अंगावर शाल होती.आटाचक्कीत दळण दळत असतानाच त्याच्या अंगावरील शालीचा कोपरा आटाचक्कीच्या ‘बेल्ट’मध्ये अडकला. वेगात फिरणाºया या ‘बेल्ट’ने शालीसोबत रवींद्रलाही स्वत:कडे क्षणार्धात ओढून घेतले. स्वत:ला सावरण्याच्या आत रवींद्र वेगात फिरणाºया ‘बेल्ट’सोबत आटाचक्कीच्या चाकात अडकला आणि तो चाकासोबत गोलाकार फिरला. हा प्रकार पाहताच तिथे दळायला आलेल्या महिलांनी आरडाओरड केली.परिणामी, रवींद्रच्या पत्नीने आटाचक्कीकडे धाव घेतली. तिने लगेच मेनस्वीच बंद केले. तोपर्यंत परिसरातील नागरिक तिथे पोहोचले. नागरिकांनी चाकात फसलेल्या रवींद्रला ‘बेल्ट’ कापून बाहेर काढले. चाकात अडकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला होता. नागरिकांनी त्याला लगेच डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला. गावात डॉक्टर नसल्याने काही वेळातच रवींद्रची प्राणज्योत मालवली.माहिती मिळताच भिवापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आटाचक्कीच्या ‘बेल्ट’ने घेतला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:57 AM
थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगावर शाल ओढून दळण दळत असताना शालीचा कोपरा आटाचक्कीच्या ‘बेल्ट’मध्ये अडकला आणि त्यासोबतच चक्कीचा मालकही आटाचक्कीच्या चाकात अडकला.
ठळक मुद्देतरुणाचा मृत्यू : धामणगाव येथील दुर्दैवी घटना, नागरिकांनी ओढून मृतदेह बाहेर काढला