नागपूर : दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतल्यानंतर पतसंस्थांनी या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. पण राज्य पतसंस्था फेडरेशनच्या आवाहनानंतर आता पतसंस्थाही दोन हजाराच्या नोटा स्वीकारत आहेत. मात्र, बँकांप्रमाणे या नोटांची अदलाबदल करण्याचे अधिकार पतसंस्थांना नाहीत.
आरबीआयच्या निर्णयानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी फेसबुक लाईव्ह करीत राज्यातील जवळपास १६ हजार पतसंस्थांना दोन हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही नागपुरातील काही पतसंस्थांनी दोन हजाराच्या नोटा रोखीने स्वीकारण्यास नकार दिला होता. अनेकांनी आरबीआयच्या नियमावलीत स्पष्टता नसल्याचे कारण दिले होते. सरकार भारतीचे पदाधिकारी विवेक जुगादे यांनीही पतसंस्थांना दोन हजाराच्या नोटा स्वीकारण्यात काहीही अडचण नसल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे.
पतसंस्थांमध्ये दोन लाखांपर्यंत रोख स्वीकारली जाते. यात दोन हजाराच्या नोटांचाही समावेश आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे पतसंस्थांनी कोणताही संभ्रम न ठेवता दोन हजाराच्या नोटा स्वीकाराव्यात. याकरिता रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करावे आणि आयकर खात्याच्या अटी पाळाव्यात, असे आवाहन विवेक जुगादे यांनी केले आहे