सेवादलाच्या मानवंदनेत कृष्णकुमार पांडे यांच्यावर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 08:21 PM2022-11-09T20:21:10+5:302022-11-09T20:22:21+5:30
राहुल गांधी, खरगेंचे प्रतिनिधी म्हणून आशिष दुआ अंत्यसंस्कारात सहभागी
नागपूर: भारत जोडो यात्रेत नांदेड येथे सहभागी झाले असता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झालेले
अ. भा. काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय संघटक कृष्णकुमार पांडे यांच्या पार्थिवावर बुधवारी वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ६५ वर्षांचे होते. प्रारंभी सेवादलातर्फे त्यांच्या निवासस्थानी मानवंदना देण्यात आली. काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण करीत कुठलीही अपेक्षा न करता पक्षासाठी झटणारा कर्मठ नेता गमावल्याची खंत व्यक्त केली.
मंगळवारी रात्री ९:३०च्या सुमारास पांडे यांचा मृतदेह नांदेडहून ॲम्ब्युलन्सद्वारे त्यांच्या मिलिंदनगर येथील निवासस्थानी आणण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी व राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या विशेष सूचनेनुसार अ. भा. काँग्रेसचे सचिव व विदर्भ प्रभारी आशिष दुआ हे मृतदेह घेऊन पोहचले. रात्रीपासून पांडे यांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सकाळी सेवादलातर्फे मानवंदना देण्यात आली. यानंतर वैशालीनगर घाट येथे अंंत्यसंस्कार करण्यात आले.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी अ. भा. काँग्रेसचे विदर्भ प्रभारी आशिष दुआ, माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, सेवादलाचे राष्ट्रीय संघटक लालजी मिश्रा, मध्यप्रदेश सेवादलाचे अध्यक्ष, माजी आ. राजहंस सिंग, छत्तीसगडचे माजी आ. चंद्रकांत वाजपेयी यांच्यासह भाजप नेते आ. कृष्णा खोपडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, रिपाइं (आ.) चे भूपेश थूलकर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. पांडे यांच्या पश्चात वडील, पत्नी छायादेवी, मुलगा नीरज व शिलज, मुलगी रितू व मोठा आप्त परिवार आहे.
सव्वा वर्षात पिता-पुत्राचा मृत्यू- कृष्णकुमार पांडे यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा धीरज याचा सव्वा वर्षापूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. धीरज युवक काँग्रेसमध्ये सक्रिय होते व कृष्णकुमार यांचा आधारस्तंभही होते. धीरज यांच्या अकाली निधनाने कृष्णकुमार काहिसे खचले होते. पण थकत्या वयातही त्यांनी स्वत:ला सावरले व काही दिवसातच ते पक्षाच्या कामात सक्रिय झाले होते. आता सव्वा वर्षात कृष्णकुमार यांच्या निधनाने पांडे कुटुंबीयांवर दुहेरी आघात झाला. याची एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.