लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेंट्रल एव्हेन्यूच्या आझमशहा चौकाजवळ ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाआड सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. लकडगंज पोलिसांनी मंगळवारी दुपारी केलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.हितेश दौलतराम जुमानी (३०) रा. छाप्रूनगर चौक, विशेष चतुर्भुज चुग (३०), अजहर खान इरशाद खान (२७), पवन राजेश आहुजा (१९) रा. कळमना आणि श्रीराम धुर्वे (२८) रा. जुनी मंगळवारी, अशी आरोपींची नावे आहेत. आझमशहा चौकाजवळ विष्णू कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये श्रीजी टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालय आहे. या कार्यालयात सट्टा अड्डा सुरु होता. लकडगंज पोलिसांना याची सूचना मिळाली. उपनिरीक्षक पी. जी. गाडेकर यांनी योजना आखून ट्रॅव्हल्स कार्यालयात धाड टाकली. तेथे आरोपी नागपुरात सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची खायवाडी करताना रंगेहात सापडले. पोलिसांनी आरोपींकडून १० मोबाईल, एलईडी, मॉनिटर आणि खायवाडीच्या चिठ्ठयासह ४ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. कारवाईची माहिती मिळताच सट्टा अड्ड्याचे सूत्रधार फरार झाले. सूत्रांनुसार या अड्ड्याचा सूत्रधार इव्हेंट कंपनी चालविणारा युवक आहे. तो मूळचा वर्धमाननगर येथील रहिवासी आहे. बऱ्याच कालावधीपासून तो मुंबईत स्थायिक झाला आहे. तेथून तो इव्हेंट कंपनी चालवितो. काही दिवसांपूर्वी तो चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरला आहे. त्याच्या इशाऱ्यावरून आरोपींनी खायवाडी केल्याची माहिती आहे. या युवकाचे शहरातील गुंडांसह पोलिसांशी संबंध आहेत. त्यांच्या मदतीने तो हा अड्डा चालवितो. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाई केली जात नाही. श्रीजी टुर्स अँड ट्रॅव्हल्स चार महिन्यापूर्वी सुरू झाले आहे. येथे क्रिकेट सट्टा अड्डा आढळल्यामुळे कार्यालयाच्या संचालकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. अड्ड्याच्या सूत्रधाराने आपला बचाव करण्यासाठी बनावट कागदपत्राद्वारे सीमकार्ड मिळविले होते. लकडगंज पोलीस रात्री उशिरापर्यंत आरोपींची चौकशी करीत होते.
नागपुरात ट्रॅव्हल्स कार्यालयात आढळला क्रिकेट सट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 11:53 PM
सेंट्रल एव्हेन्यूच्या आझमशहा चौकाजवळ ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाआड सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. लकडगंज पोलिसांनी मंगळवारी दुपारी केलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देपाच जणांना अटक, सूत्रधार फरार