ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 22 - गुन्हेशाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री लकडगंज पोलिसांच्या हद्दीत चालणा-या एका क्रिकेट सट्टा अड्डयावर धाड घालून तीन बुकींना पकडले. त्यांच्या ताब्यातून कार, मोबाईल आणि लॅपटॉपसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. रोहन दिलीपसिंग दीक्षित (वय २८, रा. जुना पारडी नाका, चंद्रनगर), शंकर श्रीचंद बत्रा (वय ३६, रा. पूर्व वर्धमाननगर) आणि नवीन बलराज खमेले (वय ३४) अशी पकडलेल्या बुकींची नावे आहेत. हे तिघे कुख्यात बुकी दिपेन भेदा (रा. वर्धमाननगर) आणि राज अलेक्झांडर (रा. जरीपटका) या दोघांकडे लगवाडी करीत होते, अशीही माहिती उघड झाली आहे.
शुक्रवारी मुबई इंडीयन्स विरूध्द द किंग्स एलेवन पंजाब या संघामध्ये आयपीएल क्रिकेटचा सामना सुरू होता. या सामन्यावर दीक्षित, बत्रा आणि खमेले सट्टा घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना कळली. त्यानुसार गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव जाधव, सहायक निरीक्षक भेदूरकर, हवलदार शत्रुघ्न श्रावणजी कडू आणि त्यांच्या सहका-यांनी बडकस चौकाजवळच्या गजानन महाराज मंदीरामागे विजय शिंदे यांच्या ईमारतीत धाड घातली. इमारतीतील दुस-या माळयावर बुकी रोहन दिक्षीत याची रूम आहे. तेथे हे तिघे सट्टयाची खयवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून ३१ मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, स्वीफ्ट कार, दोन दुचाकींसह ८ लाख, ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या तिघांनी सट्टा घेण्यासाठी वेगवेगळळ्या मोबाईलमध्ये दुस-यांच्या नावे असलेल्या सीमकार्डचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून हे सीम मिळविल्याचेही उघड झाले. त्यावरून पोलिसांनी त्यांच्यावर जुगार कायद्यासोबतच फसवणूकीचाही गुन्हा दाखल केला.
दिपेन आणि राजची डावबाजी
दीक्षित, बत्रा आणि खमेले सट्टा लावणारांकडून सट्टा घेत होते आणि त्याची उतारी कुख्यात दिपेन भेदा आणि राज अलेक्झांडर या बुकींकडे करीत होते. दीपेन आणि राज हे दोघे मध्यभारतातील टॉप २० बुकींपैकी २ आहे. त्यांचे देशविदेशातील बुकींसोबत संबंध असून, पोलिसांनी त्यांच्यावर अनेकदा कारवाईसुद्धा केली आहे. या दोघांसाठी पोलीस विभागातील ‘रतन‘सह १० पोलीस काम करतात. अनेकदा पोलिसांच्या कारवाईची टीप अन् पंटरला अटक झाल्यास मदत करण्याचेही हे पोलीसमित्र काम करतात.