लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोठ्या सट्टेबाजांवर कारवाई केल्यामुळे शहरात सक्रिय असलेले लहान बुकी सतर्क होऊन काम करीत आहेत. बजेरियात क्रिकेटची सट्टाबाजी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी बेझनबागच्या खदान ले-आऊटमध्ये सट्टेबाजी करताना पकडले आहे.
ऋषिकेश अजय रामटेके (२१), मो. रजा समसुद्दीन तिगाला (२२), साहिल मोहम्मद उर्फ गुड्डु बदरुद्दीन मोहम्मद (३१) आणि राहुल ऊर्फ लड्डु मनोहर साह (२३) बजेरिया गणेशपेठ अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी अशोक नंदेश्वर यांचे घर किरायाने घेऊन गुरुवारी रात्री राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स यांच्यात सुरू असलेल्या आयपीएल सामन्यात सट्टेबाजी करीत होते. त्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी योजना आखून तेथे धाड टाकली. तेथे तीन आरोपी सट्टेबाजी करताना आढळले. समसुद्दीन तिगाला त्यांचा सूत्रधार होता. तो बजेरियात लपून बसला होता. पोलिसांनी बजेरियातून त्यास अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समसुद्दीनचे बजेरियात किराणा दुकान आहे. त्याचा संपर्क चांगला असल्यामुळे तो अनेक दिवसांपासून सट्टेबाजी करतो. परंतु तो पहिल्यांदा पोलिसांच्या हाती लागला आहे. तो आधी लुडोच्या नावाखाली सट्टेबाजी करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याने क्रिकेटची सट्टेबाजी सुरू केली. काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी शहरातील मोठ्या सट्टेबाजांवर कारवाई केली. त्यामुळे समसुद्दीन सतर्क झाला. त्याने खदान ले-आऊटमध्ये किरायाने घर घेऊन बजेरियाचा अड्डा तेथे हलविला. शहरात सक्रिय अनेक लहान सट्टेबाजांनी आपले अड्डे याच पद्धतीने हलविले आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनाथ देवकाते, सहायक उपनिरीक्षक वहाब, नायक शिपाई रोशन तिवारी, मनिष कोकाटे, पवन यादव, विशाल नागभिडे यांनी पार पाडली.