लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसादामधून पोटॅशियम सायनाईड खाऊ घालून बुकी व मांडवली किंग सुभाष शाहूची हत्या करणाऱ्या नदीम अहमद ऊर्फ लकी गुलाम नबी (४०) याला सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दुसरा आरोपी महेश ऊर्फ गमछू नामदेव लांबट (५३) याला सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले.न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला. नदीम हा वेलकम सोसायटी, कोराडी तर, गमछू हा जुनी शुक्रवारी येथील रहिवासी आहे. आरोपीने एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभेल अशा पद्धतीने शाहूला संपवले होते. या हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली होती. २८ सप्टेंबर २०११ रोजी नदीमने साधूची वेशभूषा करून रात्री ९.३० च्या सुमारास कोतवाली पोलिसांच्या हद्दीत शाहूला गाठले. काहीवेळ धार्मिक मुद्यांवर वार्तालाप केल्यानंतर नदीमने शाहूला प्रसाद दिला. प्रसाद सेवन केल्यानंतर शाहूची प्रकृती खालावली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. परंतु, आरोपीचा सुगावा न लागल्यामुळे प्रकरण थंडबस्त्यात गेले होते. चार वर्षानंतर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी गमछूला घेरले. गमछू हा शाहूचा अत्यंत विश्वासू साथीदार होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची सखोल विचारपूस केली. त्यातून नदीमने शाहूची हत्या केल्याचे पुढे आले. त्यामुळे ५ एप्रिल २०१६ रोजी नदीमला अटक करण्यात आली. पोलिसांनी न्यायालयात ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. नदीम शेखतर्फे अॅड. आर. बी. गायकवाड, गमछूतर्फे अॅड. आर. के. तिवारी तर, शासनातर्फे अॅड. ज्योती वजानी यांनी बाजू मांडली.
नागपुरातील क्रिकेट सट्टा बुकी सुभाष शाहूच्या मारेकऱ्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:03 PM
प्रसादामधून पोटॅशियम सायनाईड खाऊ घालून बुकी व मांडवली किंग सुभाष शाहूची हत्या करणाऱ्या नदीम अहमद ऊर्फ लकी गुलाम नबी (४०) याला सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निकाल : प्रसादातून दिले होते सायनाईड