लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : निवेदन देण्यास गेलेल्या महिलांना असभ्य वागणूक देत अरेरावी करणे तसेच जीवघेणा प्रयत्न करणे रामटेकच्या भाजपा आमदार द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांना महागात पडले. त्यांच्याविरोधात महिलांनी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आमदाराविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.याबाबत रामटेक पोलीस ठाण्यात संगीता वांढरे, रा. कांद्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आशा लोखंडे, लता सोनेकर, उषा कामडे, ललिता दोंदलकर, सयनाला शेख, अम्माजी जाधव यांच्यासह २० ते २५ महिला आ. डी. एम. रेड्डी यांच्या मनसर येथील कार्यालयात शुक्रवारी सकाळी गेल्या होत्या. ‘मायक्रोफायनान्स कंपनी महिलांना त्रास देत आहे, याकडे तुम्ही लक्ष घाला, कारवाई करा’ या मागणीचे निवेदन घेऊन आपबिती सांगितली. दरम्यान निवेदन देण्याच्या तयारीत महिला असताना निवेदन घेण्यास नकार दिला. महिलांना असभ्य वागणूक देत संगीता वांढरे यांच्या अंगावर वाहन आणण्याचा प्रयत्न केला. त्यात संगीता यांच्या पायाला लागले, असे वांढरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. लोकप्रतिनिधी आमचे ऐकत नाही, असभ्य वागणूक दिली, जीव घेण्याचा प्रयत्न केला असेही तक्रारी नमूद केले. दरम्यान, आमदारांनी रामटेक पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. तेथे उपस्थित महिलांना पोलिसांनी गाडीत बसवून पोलीस ठाण्यात आणले.रामटेक पोलिसांनी सुरुवातीला चालढकल करीत महिलांची तक्रार घेण्याचे टाळले. मात्र प्रहार संघटनेचे रमेश कारामोरे, विनय चौधरी यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देताच महिलांची तक्रार घेण्यात आली. त्या तक्रारीवरून आमदार रेड्डींविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.महिलांनीच शिवीगाळ केलीमी गाडीने बाहेर निघण्याच्या तयारीत असताना २५-३० महिला आल्या. त्यांनी मायक्रोफायनान्सचा विषय सांगताच हा विषय शासनाकडे असल्याचे मी सांगितले. मात्र त्या महिलांनी तुम्ही तीन महिन्यांपासून काहीच करीत नाही, असे म्हणत मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्वीय सचिव आणि सुरक्षा रक्षकांनी महिलांना समजावले. त्या महिला काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नसल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस तेथे आले आणि महिलांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या प्रकरणात काही एक तथ्य नाही.- डी. एम. रेड्डी, आमदार, रामटेक.
भाजपा आमदार रेड्डींविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:44 AM
निवेदन देण्यास गेलेल्या महिलांना असभ्य वागणूक देत अरेरावी करणे तसेच जीवघेणा प्रयत्न करणे रामटेकच्या भाजपा आमदार द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांना महागात पडले.
ठळक मुद्देमहिलांसोबत अरेरावी : निवेदन देण्यास गेले होते शिष्टमंडळ