नरेश डोंगरे नागपूरशहरातील जुना मटकाकिंग आणि सध्या क्रिकेट सट्ट्याचा अड्डा चालवणाऱ्या एका बुकीची सहीसलामत सुटका करवून घेण्यासाठी गुन्हेशाखेच्या कर्मचाऱ्यांनी आटापिटा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगून कारवाई करणाऱ्या पोलिसांवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. त्याला दाद मिळत नसल्याचे पाहून या बहाद्दरांनी संबंधित पोलिसांना चक्क एक लाख रुपयांची आॅफर दिली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री ही धक्कादायक घडामोड घडली.किराण्याची यादी बनविण्याआड अजनीतील एक जण क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करीत असल्याची माहिती अजनी पोलिसांना मिळाली. शहानिशा केल्यानंतर रात्री ८.४० वाजता अजनी पोलिसांनी त्याच्या अड्ड्यावर (दुकानावर) धाड घातली. आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर खायवाडी करताना आतिश मोरेश्वर वाघमारे हा रंगेहात पकडला गेला. त्याच्याकडून रोख आणि मोबाईल तसेच इतर चिजवस्तूसह ९० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी बुकी आतिशला पकडल्याची वार्ता त्याच्या पंटरने परिसरातील पाठीराख्यांना दिली. त्यानुसार, बुकीच्या बचावासाठी अनेक जण धावले. कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाची समजूत काढून ‘सेटलमेंट‘चे प्रयत्न झाले. पोलीस ऐकत नसल्यामुळे धावपळ वाढली. गुन्हेशाखेतील चार कर्मचारी ‘स्पॉट‘वर धडकले. त्यांनी ‘साहेबांनी‘ पाठविल्याचे सांगून कारवाई गुंडाळण्याचे अजनी पोलिसांना आदेश दिले. बुकीवर कारवाई केली तर साहेब (वरिष्ठ अधिकारी) नाराज होतील. तुम्हाला ते महागात पडेल, असा धाकही दाखवला. त्याला न जुमानल्यामुळे मांडवलीचे प्रयत्न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी पवित्रा बदलवला. स्पॉटवरून ७० हजार रुपये जप्त करण्यात आले होते. ते तुम्हीच ठेवा आणखी ३० हजार रुपये मागून देतो, अशी आॅफरही दिली. त्यालाही दाद मिळत नसल्याचे पाहून मांडवलीकार पोलिसांनी ‘ठीक आहे कारवाई करा. मात्र, सट्टा अड्ड्याची नव्हे तर मटका अड्ड्याची करा‘, पाहिजे तर रक्कम वाढवून द्यायला लावतो‘, असा प्रस्ताव ठेवला. मांडवलीकार पोलीस वेगवेगळ्या पध्दतीने दडपण आणत असल्यामुळे रात्री १२.३० पर्यंत अजनी पोलिसांना कारवाई करणे कठीण झाले. शेवटी वरिष्ठांकडे तक्रार करू, असा दम दिल्यामुळे गुन्हेशाखेतील हे मांडवलीकार पोलीस सटकले. त्यानंतर अजनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३५६५/१५ नुसार कारवाई केली.
बुकीच्या बचावासाठी क्राईम ब्रॅन्चचे कर्मचारी
By admin | Published: May 16, 2015 2:25 AM