लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वराजनगरात सुरू असलेल्या एका सट्टा अड्ड्यावर बुधवारी रात्री धाड घातली. येथून पोलिसांनी चार बुकींना जेरबंद केले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईल आणि सट्ट्याची खायवाडी करणारे साहित्य जप्त केले.अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेसा मार्गावरील इंद्रप्रस्थ सोसायटी आहे. येथील गजानन क्लासिक कॉम्प्लेक्समधील चौथ्या माळ्यावर असलेल्या ४०१ क्रमांकाच्या सदनिकेत सट्टा अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने बुधवारी रात्री ८.२० ला तेथे छापा घातला. यावेळी तेथे योगराज शंकर काकडे (वय ३४, रा. स्वराज नगर, अजनी), कुणाल वसंतराव साबळे (वय १९, रा. नंदनवन) मोनू ऊर्फ बालाजी आणि सुभाष हे बुकी राजस्थान रॉयल विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्स दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर खायवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोबाईल आणि टीव्ही सह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, एसीपी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, सहायक निरीक्षक प्रदीप अतुलकर, मनीष वाकोडे, उपनिरीक्षक राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.कोण आहेत एस आणि दादा?पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यात आकड्याच्या नोंदीची काही कागदही आढळले. त्यातील एका कागदावर १ तारखेपासूनचा सट्ट्याचा हिशेब आणि एस तसेच दादा असे लिहिले आहे. अर्थात हे कोडवर्ड आहेत. ते कुणासाठी वापरले त्याचा गुन्हे शाखा तपास करणार असली तरी ती नावे उघड होईल का, असा प्रश्न आहे. पोलिसांनी ज्या चार बुकींना अटक केली. त्यातील दोघांची नावेही पोलिसांनी अर्धवटच प्रसिद्धीला दिली आहे, हे विशेष !