लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - विना परवाना ग्राहकांना दारू विकणाऱ्या अमरावती मार्गावरील हॉटेल निर्वाणामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा घातला. यावेळी पोलिसांनी तेथून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केला. हाॅटेलचे संचालक गुरुविंदर बिरींदर चोपरा (वय ३४), गुरुजीतसिंग बिरींदर चोपरा (वय ४०) आणि गुरुप्रीतसिंग मदनसिंग चोपरा (वय ४४, रा. तिघेही रामदासपेठ) या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अमरावती मार्गावरील हॉटेल निर्वाणामध्ये दामदुप्पट किंमत घेऊन अवैध दारू विक्री केली जाते, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री तेथे छापा घातला. यावेळी हॉटेलच्या काऊंटरवर बसलेले गुरुविंदरसिंग चोपरा यांच्या सांगण्यावरून तेथील कर्मचारी ग्राहकांना विनापरवाना दारू पुरवठा करीत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी गुरुविंदरसिंग यांना विचारणा केली असता त्यांनी ही दारू विक्री मोठ्या भावाच्या सूचनेनुसार करीत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांना तेथे रॉयल स्टॅगचे ३, ओल्डमंक ४, ब्लेंडर प्राईड ७, किंग फिशर २ आणि बडवायझरच्या ९ बाटल्या आढळल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. अवैध दारू विक्रीच्या आरोपाखाली गुरुविंदर, गुरुजीतसिंग आणि गुरुप्रीतसिंग चोपरा या तिघांविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
----