सुमेध वाघमारे (नागपूर) नागपूर : लकडगंज परिसरात गुन्हे शाखेच्या ‘युनिट-३’ ने एका कारमधून १२ लाख ७७ हजार ७७८ रुपये किमतीच्या प्रतिबंधित तंबाखू पकडला. हा तंबाखू २२ पोत्यांमध्ये भरून होता. यासोबतच तंबाखू पॅकिंग मशीन, लेबल, वजनाचे यंत्र आदी साहित्य ज्या कारमध्ये होती ती ‘एमएच ३१ डीके ९२२६’ क्रमांकाची कारही जप्त करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात सुगंधित प्रतिबंधित तंबाखू व साहित्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ‘युनिट-३’ च्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर लकडगंज परिसरात नजर ठेवण्यात आली. पोलीस पथकाने आरोपींकडून १८ लाख ४९ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रुपेश अरुण नंदनवार (वय ३४, रा. गोळीबार चौक) आणि दत्तू बबनराव सरटकर (वय ३८, जुनी शुक्रवार, तेलीपुरा) यांचा समावेश आहे. तिसरा आरोपी दुर्गेश अग्रवाल (मानकापूर) याचाही पोलीस शोध घेत आहे. आरोपींविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यात कलम १८८, २७२, २७३, ३२८ आणि अन्न व सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखेने लाखोंचा तंबाखू पकडला; लकडगंज परिसरात मोठी कारवाई
By सुमेध वाघमार | Published: May 14, 2023 6:53 PM