लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीतदेखील अल्पवयीन मुली व महिला सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील चार वर्षांत महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये महिला अत्याचारात वाढ दिसून आली. दुर्दैवाची बाब म्हणजे महिला अत्याचार दरात नागपूरचा क्रमांक राज्यात पहिला व देशात चौथा आहे. एका अर्थाने महिला अत्याचारात नागपूर राज्याची क्राईम कॅपिटल असल्याचे चित्र आहे. एनसीआरबीच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
२०२० मध्ये नागपुरात १८ वर्षांहून अधिक वयाच्या ७९ महिलांवर अत्याचार करण्यात आले. महिला अत्याचाराचा दर ६.५ इतका होता. मुंबई, पुण्याचा हाच दर दरहजारी ३.८ व २.५ इतका होता. महिला अत्याचाराच्या दरात नागपूरचा देशात चौथा व राज्यात पहिला क्रमांक आहे. जर आकड्याचा विचार केला तर हाच क्रमांक सहावा आहे. २०१९ साली हाच आकडा ७३ इतका होता.
‘पॉक्सो’ अंतर्गत एकूण १९६ गुन्हे दाखल
२०१८ च्या तुलनेत २०२० मध्ये तर अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा आकडा वाढला आहे. ‘पॉक्सो’ अंतर्गत (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेसन) दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये नागपूरचा दर देशात तिसरा आहे. २०२० साली नागपुरात ‘पॉक्सो’ अंतर्गत एकूण १९६ गुन्हे दाखल करण्यात आले व १९८ मुली पीडित ठरल्या. यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची संख्या ९३ इतकी होती. तर १०३ प्रकरणांत १०५ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रयत्न करण्यात आले.
अपहरण दरात देशात पाचव्या स्थानी
लॉकडाऊन असूनदेखील गुन्हेगार निर्ढावलेले होते व २०२० मध्ये महिलांच्या अपहरणाचा राज्यातील सर्वाधिक दर नागपुरातच नोंदविण्यात आला. नागपुरात २५३ महिलांचे अपहरण झाले व पुण्यात हाच आकडा २६० इतका होता. अपहरणाच्या गुन्ह्यांचा दर नागपुरात २०.१ इतका होता. हा दर बिहारची राजधानी पाटण्याहून अधिक होता. मुंबईत ९ तर पुण्यात १०.७ इतका दर नोंदविण्यात आला.
विविध गुन्ह्यांत दरात देशातील क्रमांक
गुन्हे- गुन्हेदरातील क्रमांक
महिला अन्यायाचे गुन्हे-६ वा
पॉक्सो -३ वा
अल्पवयीन मुलींवरील अत्याचार-४ वा
महिला अत्याचार-४ वा
अपहरण-५ वा
वर्षनिहाय महिला अत्याचाराचा आकडा व दर
वर्ष – आकडा - दर
२०१८ – ६९ – ५.६
२०१९ – ७३ – ६.०
२०२० – ७९ – ६.५
शहर – महिलांविरोधातील अपराधाचा दर
नागपूर - ७५.३
मुंबई - ५३.८
पुणे - ४४.१
अपहरणाची आकडेवारी व दर
शहर - आकडा - दर
नागपूर - २५३ - २०.१
मुंबई- ७७३ - ९.०
पुणे- २६० - १०.७
अल्पवयीन मुलींवरील अत्याचार
वर्ष - आकडा - दर
२०१८ - ९१ - ७.३
२०१९ - १११ - ९.०
२०२० - ९३ - ७.६
‘पॉक्सो’अंतर्गत दाखल गुन्हे
वर्ष - एकूण गुन्हे - दर
२०१८ - १९५ - १५.८
२०१९ - २३१ - १८.९
२०२० - १९८ - १६.०