नागपूर : स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या एका महिलेने आपल्या मैत्रिणीला २१ लाख रुपयांचा फटका दिला. पोलिसांकडे प्रकरण पोहचल्यानंतर त्याचा बोभाटा झाला. हर्षा नितीन जोशी (वय ४४, रा. शांतिनगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
हर्षा जोशी स्वत:ला समाजसेविका म्हणवून घेत होत्या. काही वर्षांपूर्वी हर्षा यांनी आपल्या घरावर बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज फेडू न शकल्याने बॅंकेने त्यांचे घर दोन वर्षांपूर्वी ताब्यात घेतले. त्यामुळे हर्षा यांनी त्यांची मैत्रिण राजश्री रंजित सेन (वय ५०) यांच्याकडे मदतीची याचना केली होती. त्यानुसार, २२ सप्टेबर २०२० ला राजश्री यांनी हर्षा यांना २१ लाखाची मदत केली. हर्षा यांनी ती रक्कम बँकेत जमा केल्याने बॅंकेने त्यांच्या घराचा ताबा सोडला.
दरम्यान, ही रक्कम लवकर परत दिली नाही तर त्या बदल्यात त्यांच्या दुसऱ्या घराची रजिस्ट्री करून देण्याचे ठरले होते. त्यानुसार, राजश्री यांनी हर्षा यांना वारंवार रक्कम परत मागितली. मात्र हर्षा यांनी रक्कमही परत केली नाही अन् दुसऱ्या घराची रजिस्ट्रीही लावून दिली नाही. मैत्रिणीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे राजश्री यांनी शांतिनगर पोलिसांकडे शनिवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी हर्षा जोशी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
पैशामुळे आले वितुष्ट
विशेष म्हणजे, हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीपर्यंत हर्षा आणि राजश्री या दोघी समाजसेविका म्हणून एकत्रच फिरत होत्या. विविध ठिकाणी त्या मैत्रिणी म्हणून एकत्र दिसायच्या. मात्र, पैशाच्या व्यवहारामुळे आता त्यांच्यात वितुष्ट आले.