नागपूर : पोर्टर म्हणून कामाला असताना स्टेशन मास्टरने गैरहजेरी टाकल्यामुळे धमकी देऊन स्टेशन मास्टर कार्यालयात तोडफोड करणाऱ्या फरार आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी ३६ वर्षांनंतर अटक करून गजाआड केले आहे. गुन्हा केला तेव्हा आरोपीचे वय ३५ वर्षे होते. तर आता तो ७० वर्षांचा झाला आहे.
सुरेशकुमार रामरतन बनवारी (७०, रेल्वे क्वार्टर नागभिड, जि. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोर्टर म्हणून रेल्वेत कामाला होता. १९८६ मध्ये स्टेशन मास्टरने गैरहजेरी टाकल्यामुळे त्याने धमकी देऊन स्टेशन मास्टर कार्यालयात तोडफोड केली होती. त्यानंतर त्याची बदली छिंदवाडा येथे झाली. तेव्हापासून तो फरार होता. त्याने नोकरी सोडली होती. न्यायालयाने या प्रकरणात वॉरंट दिल्यामुळे लोहमार्ग पोलीस त्याचा शोध घेत होते.