नांदेड : पोलिस कर्मचाऱ्याचे ओळखपत्र चोरून बनावट कागदपत्राद्वारे मल्टिस्टेट अर्बन बँकेत खाते काढल्यानंतर त्या माध्यमातून सात वर्षांत साडेचार कोटींचे व्यवहार करण्यात आले. या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सोमनाथ जगन्नाथ पत्रे हे पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर आहेत. त्यांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्राची झेरॉक्स आणि फोटो चोरण्यात आले होते. त्याद्वारे बनावट कागदपत्रे तयार करून १३ मे २०१४ रोजी श्री रेणुकामाता मल्टिस्टेट अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. अहमदनगर मध्ये त्यांच्या नावाने खाते काढण्यात आले. पत्रे यांची बनावट सही आणि अंगठा वापरून आरोपींनी २० मार्च २०२३ पर्यंत जवळपास ४ कोटी ४६ लाख १९ हजार ५४१ रुपयांचे व्यवहार केले. हे व्यवहार आणि खात्याबाबत पत्रे यांना काहीच माहिती नव्हती. मागील महिन्यात पत्रे यांना ही बाब कळाल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली.