योगेश पांडे
नागपूर : वयाच्या २३ व्या वर्षी ती त्याच्या प्रेमात वेडी झाली आणि परंपरा-प्रतिष्ठा या साऱ्या गोष्टी बाजूला सारत घरच्यांच्या मर्जीविरोधात जाऊन लग्न केले. राजाराणीचा संसार आणखी फुलत जाईल जाईल असे स्वप्न रंगवत असतानाच तिच्या पतीचा काळा चेहरा समोर आला. पतीने अगोदर एक नव्हे तर दोन लग्न केल्याची बाब समोर आली आणि तिच्या आयुष्याच्या स्वप्नांचा आरसा खाडकन् फुटला. मात्र संकट तिथेच थांबले नाही. अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला जिवंत गाडण्याची धमकी पती देत असून नराधमापासून तिचा बचाव कसा करावा यासाठी तिची धावपळ सुरू आहे.
एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट शोभेल असा हा प्रकार जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. जरीपटक्यातच माहेर असलेल्या संबंधित महिलेचे मनीषनगरात राहणाऱ्या राहुल बालेकरवर प्रेम जडले. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या, मात्र जातीच्या मुद्द्यावरून तिच्या घरून प्रचंड विरोध होता. तिने घरच्यांपेक्षा त्याच्या प्रेमाला अधिक महत्त्व दिले व काही परिचितांच्या उपस्थितीत २०१७ मध्ये कोराडी येथे त्याच्याशी लग्न केले.
लग्नानंतरचे काही दिवस अगदी स्वप्नवत गेले. मात्र त्यानंतर राहुलचे अगोदर दोन लग्न झाल्याची बाब तिच्या समोर आली. ती मनातून हादरून गेली होती. माहेरच्यांना दूर करून ज्याच्याजवळ आली तो असा वागेल यावर तिला विश्वासच बसत नव्हता. ती जेव्हा त्याला विचारणा करायची तेव्हा तो मारहाण करायचा. त्यातच २०१९ मध्ये तिला मुलगी झाली व तिच्या भविष्यासाठी ती त्याचा छळ सहन करत त्याच्याच घरी रहायला लागली. दारू पिऊन तो तिला खूप मारहाण करायचा. अखेर त्याच्या छळाला कंटाळून ती डिसेंबर २०२१ मध्ये माहेरी परतली. त्यानंतरही त्याचा त्रास सुरूच होता.
११ जुलै रोजी तो सकाळी तिच्या माहेरी पोहोचला व त्याने शिवीगाळ सुरू केली. त्याने महिलेला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘तीन वर्षांच्या मुलीला तर जिवंतच गाडून टाकेन’ या त्याच्या शब्दांनी महिला आणखी हादरली. ज्याच्यावर जीव ओवाळला होता तो आपल्याच लेकीचा जीव घेण्याची भाषा करतो आहे हे पाहून तिने अखेर जरीपटका पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी राहुलविरोधात फसवणुकीसह पाच विविध गुन्हे नोंदविले आहेत.
माहेरच्यांनी दिला हात
राहुलशी लग्न करण्याच्या महिलेच्या निर्णयाला माहेरच्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. मात्र महिलेने त्यांच्या विरोध झिडकारून त्याच्याशी लग्न केले होते. हा प्रकार झाल्यावर माहेरच्या लोकांनीच तिला मदतीचा हात दिला आहे.