नागपूर : २०२२ मध्ये हत्येच्या घटना कमी झाल्याची आकडेवारी सादर करत पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतःची पाठ थोपटली होती. मात्र, २०२३ मध्ये पहिल्या १२ दिवसांतच पाच हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याशिवाय वर्षाच्या पहिल्या दहा दिवसांतच एकूण गुन्ह्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सरासरी एका दिवसाआड एक हत्या तर प्रत्येक दिवशी ३० गुन्हे झाल्याचे वास्तव आहे. शहरात गुन्हेगार परत ‘ॲक्टिव्ह’ झाले असून खुलेआम गुन्हे करत पोलिस यंत्रणेला आव्हानच दिले जात आहे.
पोलिसांच्याच आकडेवारीनुसार २०२२ साली ७ हजार ७९६ गुन्हे दाखल झाले होते. याचाच अर्थ दर दिवसाला सरासरी २१ गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, २०२३ मध्ये पहिल्या दहा दिवसांतच जवळपास ३०० गुन्हे नोंदविले गेले व दर दिवसाची सरासरी ३० गुन्हे इतकी आहे. २०२२ मध्ये ६५ हत्या झाल्या होत्या. सरासरी दर पाच ते सहा दिवसाला एक हत्या झाली होती. मात्र, या वर्षी पहिल्या १२ दिवसांतच सहा हत्यांची नोंद झाली असून दर दोन दिवसांत एक हत्या झाली आहे. ही आकडेवारीच नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
नवीन वर्षांत एक जानेवारीला पाचपावली पोलिस ठाण्यातून हत्येचे सत्र सुरू झाले. यानंतर सक्करदरा, कळमना, हिंगणा, अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्या आहेत. कळमना घटना वगळता इतर सर्व घटनांमध्ये मयत किंवा आरोपी व्यावसायिक गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून खुनाच्या घटना घडणे हे चिंतेचे कारण आहे. मेडिकलमध्ये सैतानी बापाने आपटून मारलेल्या बाळाचा मृत्यू झाल्यावर हत्येच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
झाडाझडती बंद झाली का ?
शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून ‘क्राइम कंट्रोल’साठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून हवे तसे सहकार्य मिळत नसल्याची चर्चा आहे. अनेक गुन्हेदेखील वेळेवर नोंदविण्यात येत नसून योग्य आकडेवारी वेळेत पोलिस यंत्रणेत ‘फिड’देखील होत नाही. गुन्हेगारी नियंत्रणाचा दावा केला जात असला तरी गुन्हेगार मात्र अनियंत्रित असल्याचे वास्तव यातून उघड होत आहे. गुन्हेगार बिनधास्त रस्त्याने घातक शस्त्रे घेऊन फिरत असताना पोलिसांना ते का दिसत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहरातील संवेदनशील भागातील गस्त कमी झाल्याची नागरिकांचीच ओरड आहे, तर पॅरोलवरून सुटून आलेल्या गुन्हेगारांवर हवा तसा ‘वॉच’ नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- २०२२ : दररोज सरासरी २१ गुन्हे, पाच-सहा दिवसांआड हत्या
- २०२३ : दहा दिवसांत दररोज सरासरी ३० गुन्हे, दोन दिवसांआड हत्या