जरीपटका पोलिसांची भूमिका संशयास्पद नरेश डोंगरे नागपूरगुन्हेगार पोलिसांपासून दूर पळतो. मात्र, पोलिसांच्याच हातून गुन्हा घडला तर त्याने कुणाकडे पळावे...? प्रश्न गंभीर आहे अन् उत्तर त्याच्यापेक्षाही गंभीर आहे. हातून पाप घडल्याने ‘कारवाईचा धोका’ लक्षात आल्यामुळे दोषी पोलिसानी चक्क गुन्हेगारांशी जवळीक साधली आहे. आपली मानगुट सोडवण्यासाठी गुन्हेगाराला कागदपत्रे तयार करून देण्याचीही कसरत चालवली आहे. मात्र, हा संशयास्पद प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आल्याने जरीपटक्यातील प्रकरण पाचपावली ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारीची घाण साफ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोक्काचा धडाका लावून दोन-तीन वगळता सर्वच मोठ्या गुन्हेगारांना जेलयात्रा घडविण्यात आली आहे. जे बाहेर आहेत, त्यांच्याही पापाचा अहवाल गुप्तपणे तयार केला जात आहे. काहींवर एमपीडीए तर काहींवर हद्दपारीची कारवाई सुरू आहे. शहरातील २४ ही पोलीस ठाण्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे ठाणेदारांना निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार, बहुतांश ठाणेदार आपापल्या हद्दीतील अवैध धंदेवाले, गुन्हेगारांना बाहेर हुसकावून लावण्यासाठी कामी लागले आहे. ‘फेसबुक’ प्रकरणाची तक्रारनागपूर : जरीपटका पोलीस ठाणे मात्र त्याला अपवाद ठरले आहे. गेल्या महिनाभरात येथे अवैध मटक्याचे अड्डे अन् काही बुकींनी नवे हायटेक अड्डे सुरू केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, शीख समुदायातील दोन गट आमने-सामने आले आहे. त्यातील एका गटाच्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या इशाऱ्यावरून ठाणेदाराने शीख समुदायाच्या एका गुरुद्वारातील प्रधानावर एकतर्फी कारवाई केली आहे. हे प्रकरण पेटल्यामुळे खुद्द सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी गुरुवारी जरीपटका ठाण्यात भेट देऊन प्रकरणाचे वास्तव समजून घेतले. दोन्ही बाजू तपासल्यानंतर या प्रकरणात जरीपटक्याच्या ठाणेदाराची भूमिका संशयास्पद वाटल्यामुळे या प्रकरणाशी जुळलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त, सहआयुक्तांनी पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांना सूचना केल्या. त्यामुळे उपायुक्त लाटकर यांनी शुक्रवारी दिवसभर या प्रकरणाची चौकशी करून वास्तव तपासले. त्यातही जरीपटका ठाणेदाराची भूमिका संशयास्पद दिसल्याने आणि तक्रारकर्त्यांना जरीपटक्यात न्याय मिळणार नसल्याचे लक्षात आल्याने ही तक्रार जरीपटका ठाण्यात न नोंदवता पाचपावलीच्या ठाणेदारांना नोंदविण्याचे निर्देश उपायुक्त लाटकर यांनी दिले. त्यानुसार पाचपावलीचे ठाणेदार राजू बहादुरे यांनी शनिवारी दिवसभर ‘फेसबुक’ प्रकरणाची तक्रार नोंदवून घेतली.(प्रतिनिधी)आरोपीच्या हातात अहवाल दरम्यान, आपले पाप चव्हाट्यावर येत असल्याने संभाव्य धोका लक्षात आल्यामुळे दोषी पोलिसांनी अवघ्या काही तासातच एका परिवाराशी (ज्याच्यामुळे जरीपटका ठाणेदार अडचणीत आले.) संबंधित व्यक्तींचा गुन्हेगारी अहवाल तयार केला आणि तो दुसऱ्या गुन्हेगाराच्या हातात सोपविला आहे. कुणी बनविला अहवाल? संबंधित परिवारातील सदस्यांवर २००३ पासून तो १६ मार्च २०१६ पर्यंतच्या गुन्ह्यांचा (अगदी दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचा) अहवाल तयार करून तो मित्र गुन्हेगाराच्या हातात सोपवला आहे. हा अहवाल कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या संमतीने ‘त्या’ गुन्हेगाराच्या हातात सोपविण्यात आला, तो कुणी तयार केला, हे मुद्दे तपासाचा विषय ठरले आहेत. या गंभीर प्रकाराची दखल वरिष्ठांकडून कशा पद्धतीने घेतली जाते, त्याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
एकाचा गुन्हेगारी अहवाल दुसऱ्या गुन्हेगाराच्या हातात
By admin | Published: March 20, 2016 2:52 AM