लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्याच्या निवडणुकात रिंगणात असलेल्यांपैकी २५ टक्के उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल असून खटले सुरू आहेत. तर २२ टक्के उमेदवारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ‘एडीआर’ने (असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स) केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ३० जागांवर मतदान होणार आहे. या जागांसाठी १९१ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील ४८ उमेदवारांविरोधात गुन्हेगारी खटले दाखल असून, ४२ जणांविरोधातील गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. १२ उमेदवारांवर तर महिलांविरोधातील गुन्ह्यांचे खटले सुरू असून, एका जणावर बलात्काराचे प्रकरण दाखल आहे.
५० टक्के उमेदवारांचे शिक्षण बारावीपर्यंत
निवडणुकीतील ५० टक्के उमेदवारांचे शिक्षण हे पाचवी ते बारावीपर्यंत झाले आहे, तर ४८ टक्के उमेदवार पदवीधर आहेत. २ टक्के उमेदवारांचे पदविका शिक्षण झाले आहे.
पक्षनिहाय आकडेवारी
पक्ष – एकूण उमेदवार – गुन्हे दाखल असलेले उमेदवार - टक्केवारी
भाजप – २९ - १२ - ४१ %
काँग्रेस-६-२- ३३ %
तृणमूल - २९ - १० - ३५ %
माकपा- १८ - १० - ५६ %
बसपा - ११ -१-९ %
१० टक्के उमेदवार कोट्यधीश
रिंगणात असलेल्यांपैकी १० टक्के उमेदवार हे कोट्यधीश आहेत, तर उमेदवारांची सरासरी संपत्ती ४३.७७ लाख इतकी आहे. दोन कोटींहून अधिक संपत्ती असलेल्यांची टक्केवारी ४ टक्के इतकी आहे.
उमेदवारांची संपत्ती
संपत्ती-उमेदवारांची संख्या-टक्केवारी
२ कोटींहून अधिक-७-४ %
५० लाख ते १ कोटी- ४० - २१ %
१० लाख ते ५० लाख- ६९ - ३६ %
१० लाखांहून कमी- ७५ - ३९ %
पक्षनिहाय कोट्यधीश
पक्ष- कोट्यधीश उमेदवार (टक्केवारी)
भाजपा- १४ %
काँग्रेस- ३३ %
तृणमूल- ३१ %
माकपा- ११ %
बसपा-९ %