लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियाच्या असुरक्षित वापरामुळे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ‘हॅक’ होण्याचे गुन्हे वाढल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी जनतेला खबरदारीचे आवाहन केले आहे.अलीकडे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट ‘हॅक’ करून त्याचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारी सारख्या वाढत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या ८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलीस त्यांची चौकशी करीत आहेत. मात्र, असे गुन्हे वाढू नयेत म्हणून पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजनाही सुचविल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक दोन पद्धतीने ‘हॅक’ केले जाते. लिंक पाठवून किंवा फोन करून ओटीपी घेऊन आरोपी सुरवातीला संबंधित व्यक्तीला एक लिंक पाठवतो. त्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती घेऊन व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक हॅक केले जाते. ज्या व्यक्तीचा व्हॉट्सअॅप केला, त्याच्याच मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नंतर चॅटिंगच्या माध्यमातून ओटीपी मागितला जातो. ओळखीच्या व्यक्तीकडून ओटीपी मागितला गेल्यामुळे कोणीही सहजपणे ६ अंकी नंबर किंवा ओटीपी सांगून देतो. नंतर त्याचे अकाउंट ‘हॅक’ होते. ही साखळी सारखी वाढतच असून अशा प्रकारचे गुन्हे नागपूर शहरातच नव्हे तर नागपूर ग्रामीण पुणे, मुंबई, ठाणे आणि राज्यातील अनेक ठिकाणी होत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या गुन्ह्यांचा तपास सायबर सेल करीत आहे. पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, आज कुणीही व्यक्ती आपले फोटो, व्यक्तिगत माहिती, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. त्या फोटो, व्हिडिओचा दुरुपयोग करून आरोपी संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करतात. त्याच्याकडून खंडणीही उकळली जाऊ शकते. असे अनेक गुन्हे पुढे आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी खास करून तरुणाईने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.टू स्टेपद्वारे सुरक्षित करासोशल अकाउंट किंवा ई-मेल व्हेरिफिकेशन टू स्टेपद्वारे सुरक्षित करून वापरावे, असे पोलिसांनी कळविले आहे. आपले व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्यास किंवा आपल्याकडून ते व्यवस्थित हाताळले जात नसल्याची शंका आल्यास पोलिसांच्या सायबर सेलमध्ये संपर्क करावा, असे आवाहनही स्थानिक सायबर शाखेच्या पोलिसांनी केले आहे
व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ‘हॅक’ होण्याचे गुन्हे वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 11:42 PM
सोशल मीडियाच्या असुरक्षित वापरामुळे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ‘हॅक’ होण्याचे गुन्हे वाढल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी जनतेला खबरदारीचे आवाहन केले आहे.
ठळक मुद्देनागपुरात आठ तक्रारी : पोलिसांचे नेटकऱ्यांना सावधगिरीचे आवाहन