योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमधील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक रिंगणात १९ उमेदवार असून यापैकी ३८ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना कायदेशीरदृष्ट्या ‘व्हाईट कॉलर’ उमेदवार अपेक्षित असतात. मात्र एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के जणांविरोधात विविध प्रकारचे फौजदारी खटले प्रलंबित आहेत.
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. सर्वच पक्ष व अपक्ष मिळून मतदारसंघात १९ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र प्रत्यक्षात १८ उमेदवारांचेच शपथपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. एकूण उमेदवारांच्या संख्येच्या तुलनेत टक्केवारी काढली असता निवडणुकीत पाच म्हणजेच २७.७८ टक्के उमेदवारांविरोधात एक किंवा त्याहून अधिक फौजदारी खटले प्रलंबित आहेत. दोन उमेदवारांविरोधात तर अनुक्रमे १६ व १८ खटले प्रलंबित आहेत.
संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे
शपथपत्रे उपलब्ध असलेल्या उमेदवारांपैकी सात म्हणजेच ३८.८९ टक्के उमेदवारांची वैयक्तिक संपत्ती एक कोटी किंवा त्याहून अधिक आहे. केवळ एकाच उमेदवाराची संपत्ती १ लाखाहून कमी आहे. २२.२२ टक्के उमेदवारांची मालमत्ता ५० लाख ते १ कोटी यादरम्यान आहे. सर्वाधिक चार कोट्यधीश हे अपक्ष असून नोंदणीकृत पक्षांमधील तीन उमेदवारांची संपत्ती कोटीहून अधिक आहे.
६० टक्के उमेदवार नागपुरातील
पदवीधर मतदारसंघात ६१.११ टक्के उमेदवार हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल चंद्रपूर (१६.६७ टक्के), वर्धा (११.११ टक्के) व भंडारा तसेच गोंदिया (५.५६ टक्के) येथील उमेदवार आहेत.
३९ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांहून अधिक
तब्बल ३८.८९ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे ५ लाख किंवा त्याहून अधिक आहे. २७.७८ टक्के उमेदवारांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न निरंक असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.
उमेदवारांची एकूण मालमत्ता
मालमत्ता - उमेदवारांची टक्केवारी
१ लाखाहून कमी - ५.५६
१ लाख ते १० लाख- ५.५६
१० लाख ते २५ लाख - २२.२२
२५ लाख ते ५० लाख - ५.५६
५० लाख ते १ कोटी - २२.२२
एक कोटीहून अधिक - ३८.८८