लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकल परिसरातील स्वीमिंग पूलमध्ये तरुण अभियंता नवीन श्रीराव यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आरोपींमध्ये स्वीमिंग पूलचे कंत्राटदार दिलीप पुरुषोत्तम हेलचेल (५६) रा. हनुमाननगर, प्रशिक्षण मनीष बावणे, दिगंबर मारबते, उदाराम पेंदाम, निशील बांते, अजिंक्य घायवटसह एक अल्पवयीन यांचा समावेश आहे. ही घटना मेडिकल रुग्णालय परिसरातील स्वीमिंग पूलमध्ये २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली होती. अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत संबंधितांचे केवळ बयानच नोंदविले जात होते. परंतु मृत नवीनचे वडील छगन श्रीराव यांचे बयान मात्र नोंदवले जात नसल्याचा आरोप होत होता. यादरम्यान फिर्यादी वडील सहायक आयुक्त,उपायुक्तांपासून तर पोलीस आयुक्तांपर्यंत लेखी तक्रार करीत बयान नोंदविण्याची मागणी करीत होते. अखेर पोलीस आयुक्त व उपायुक्तांच्या निर्देशानंतर अजनी पोलिसांनी १८ मे रोजी फिर्यादीला बयान नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. परंतु फिर्यादीने सांगितल्यानुसार मेडिकल प्रशासनाच्या स्वीमिंग पूलशी संबंधित अधिकाऱ्यांबाबत उल्लेख केला असता अजनी पोलीस ऐकायला तयार नव्हते. यावर आक्षेप घेतल्यामुळे अजनी पोलिसांनी सोमवारी बोलावल्याची माहिती देत परत पाठवले. मंगळवारी अचानक अजनी पोलिसांनी स्वीमिंग पूलचे ठेकेदार, प्रशिक्षक, सुरक्षा रक्षकासह सहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात आरोपींनी घटनेच्या वेळी पूलमध्ये केवळ ३० लोकांच्या पोहण्याची व्यवस्था असताना ५६ लोकांना प्रवेश दिल्याचे उघडकीस आले. यासोबतच नवीन प्रशिक्षणार्थी नवीन स्वीमिंग पूलमध्ये उतरत असताना संबंधित आरोपींनी लक्ष दिले नाही. स्वीमिंग पूलमध्ये प्रशिक्षित ट्रेनर आणि सुरक्षा रक्षकांनाच तैनात केले जाते. विशेष म्हणजे अभियंता नवीन बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी कुठलीही तत्परता दाखविण्यात आली नाही. त्यामुळे स्वीमिंग पूलचे ठेकेदार, प्रशिक्षक आणि सुरक्षा रक्षकांच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे नवीनचा जीव गेला. अजनी पोलिसही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करीत आहे.गुन्हा दाखल, फिर्यादीचे बयान नाहीदुसरीकडे दु:खी वडील छगन श्रीराव यांचे म्हणणे आहे की, त्यांना गुन्हा दाखल झाल्याबाबतची माहितीसुद्धा मिळाली नाही. यासोबतच त्यांचे बयान अजूनही नोंदविण्यात आलेले नाही. परंतु स्वीमिंग पूलचा मालकीहक्क असणाऱ्या मेडिकल प्रशासनाची जबाबदारीही संपत नाही. त्यांच्या क्षेत्रातील स्वीमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांची सुरक्षा व्यवस्था योग्य आहे की नाही, हे पाहण्याची त्यांचीही जबाबदारी आहे.