सराईत गुन्हेगाराची बनवाबनवी अंगलट : पोलिसांनी उधळला डाव
नरेश डोंगरे!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगार कितीही धूर्त असला तरी सतर्क पोलीस अधिकारी त्याचे पाय त्याच्या गळ्यात बरोबर घालतात. शुक्रवारी त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
क्रिकेट बेटिंगच्या आरोपात पकडलेल्या कुख्यात सिराज शेख नामक गुन्हेगाराने पोलीस कोठडी टाळण्यासाठी साथीदाराच्या मदतीने कोरोनाबाधित असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांकडे सादर केले. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि उपायुक्त सारंग आव्हाड यांनी ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे शोधून काढतानाच सिराज आणि त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या.
प्रकरण असे आहे, गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आठवड्यांपूर्वी छापा टाकून क्रिकेट बेटिंग करणाऱ्या चार आरोपींना अटक केली होती. पाचवा आरोपी सिराज फरार होता. सिराजची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याला तातडीने अटक करण्यासंबंधीचे निर्देश दिले. परिमंडळ तीनचे प्रभारी पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी गुरुवारी (दि. ६) रात्री आपल्या पथकामार्फत कुख्यात सिराजला पकडले. ही माहिती कळताच पोलीस आयुक्त गणेशपेठ ठाण्यात पोहोचले. त्यांनी स्वतः सिराजची खबरबात घेतली.
दरम्यान, पोलिसांनी पकडताक्षणीच आपल्यावर कडक कारवाई होईल, असे संकेत मिळाल्यामुळे सिराजने साथीदाराच्या माध्यमातून कोरोनाबाधित असल्याचे मिळविले. ते रात्रीच पोलिसांना दाखविले आणि ठाण्यातून जामीन मिळविण्याची तजवीज केली. पोलिसांनी मात्र, जामीन देण्याऐवजी सिराजला पाचपावलीच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले. त्याचे प्रमाणपत्र बनावट असावे, अशी शंका पोलीस आयुक्तांना होती. त्यामुळे त्यांनी उपायुक्तांना शहानिशा करण्याची सूचना केली. त्यानुसार उपायुक्त आव्हाड यांनी सिराजची शुक्रवारी टेस्ट करून घेतली. त्यात तो निगेटिव्ह आला. त्यामुळे ज्याच्याकडून त्याने प्रमाणपत्र आणले होते, त्या गजानन कोहाडकर तसेच जावेदला पोलिसांनी शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले.
---
नमुना एकाचा, नाव दुसऱ्याचे
कोहाडकर हा धंतोलीतील एका लॅबमध्ये काम करतो. त्याने पैशाच्या लोभापोटी दुसऱ्याच एका पेशंटचे नमुने तपासणीला दिले आणि नाव मात्र सिराजचे दिले. त्यामुळे तो पॉझिटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र त्याला लॅबने दिले होते.
---
दुसरा गुन्हा दाखल
जुगाराच्या जामीनपात्र गुन्ह्यात कोठडी टाळण्यासाठी सिराजने साथीदाराच्या मदतीने प्रमाणपत्राची बनवाबनवी केली. मात्र, पोलिसांनी ती उधळून लावत त्याच्यावर शुक्रवारी रात्री गणेशपेठ ठाण्यात फसवणुकीच्या आरोपाखाली नवीन गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
.----