योगेश पांडे
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी गुलाम अशरफीला अटक झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागपुरातील जवळपास सर्वच पक्षात अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांचा भरणा आहे. मात्र, आगामी निवडणुका लक्षात सत्ताधारी भारतीय जनता पक्षासमोर ‘क्रिमिनल फ्री’ व उमेदवारांचा ‘क्लिन फेस’ नेणे आवश्यक झाले आहे. भाजपकडून कितीही शुचितेचा दावा करण्यात येत असला तरी आजच्या तारखेत पक्षात काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व गुन्ह्यांची नोंद असलेले कार्यकर्ते आहेत, हे वास्तव आहे.
भाजपमधील गुन्हेगारीकरणाचा मुद्दा दोन महिन्यांपूर्वीच चर्चेला आला होता. एप्रिल महिन्यात पाचपावली पुलावर सराफा व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून दागिने व दुचाकी लुटण्यात आली होती. पोलिसांनी १० तासांत या प्रकरणाचा छडा लावून भाजयुमो कार्यकर्त्यांसह ६ आरोपींना अटक केली होती. संबंधित तरुण भाजयुमोमधून काढण्यात आले होते, अशी सारवासारव नंतर पक्षाने केली होती.
केवळ हेच प्रकरण नाही तर पक्षातील काही पदाधिकारी त्यांच्या गुन्ह्यांमुळे चर्चेत असतात. संघटित बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यावर विरोधकांनी अनेकदा गुन्हेगारी कृत्यांचे आरोप लावले. त्यांच्याविरोधात पोलिसांनीदेखील विविध प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत.
त्याचप्रमाणे विद्यमान नगरसेवक विकी कुकरेजा, बंटी कुकडे यांच्या विरोधातदेखील विविध गुन्हे दाखल आहेत.
भाजपच्या विजयी मिरवणुकीत ‘डॉन’
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती यश मिळविले. आ. विकास कुंभारे व आ. मिलिंद माने यांच्या विजयी रॅलीत कुख्यात गुंड संतोष आंबेकर रॅलीत थेट रथावर दिसला होता. तर विधान परिषद निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर परिणय फुके यांच्या भंडारा येथील रॅलीत सहभागी झाला होता व त्यांची गळाभेट घेतानादेखील तो दिसून आला होता.
अनेक कार्यकर्ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
भाजपने शहर कार्यकारिणीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना स्थान देण्याचे टाळले आहे. मात्र, विविध मंडळे व प्रभागस्तरावर अशा काही कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत उठबस असते. भाजपचे काही विशिष्ट पदाधिकारी तर नियमित असा कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात. याबाबत नेते खंडन करत असले तरी कार्यकर्ते व नागरिकांना वस्तुस्थितीची जाण आहे.
मागील काही वर्षांतील भाजपचे ‘प्रताप’
- २०१८ मध्ये विनोद मसराम या गुन्हेगाराची भाजप शहराच्या आदिवासी आघाडीचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
- काही वर्षांअगोदर भाजयुमोचा पश्चिम नागपूर उपाध्यक्ष असलेल्या सुमित ठाकूरची चर्चा झाली होती. त्याच्याविरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. भाजपवर त्यावरून बरीच टीकादेखील झाली होती.
- २०१९-२० मध्ये तत्कालीन भाजयुमो उपाध्यक्ष तपन जैस्वाल याने व्याजाने पैसे देण्याच्या नावावर अनेकांची फसवणूक केली होती. त्याची हकालपट्टी करण्यात आली होती.
- जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या नरेंद्र सिंह दिगवा याला २०१८ मध्ये भाजपाने उत्तर नागपूर मंडळाचा झोपडपट्टी आघाडीचा उपाध्यक्ष बनविले होते.
-तीन वेळा नगरसेवक असलेले प्रवीण भिसीकरला जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले होते व अटक झाली होती.