चौघांना अटक : सात गुन्हे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना पोलिसांनी लुटमार, घरफोडी आणि चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची एक टोळी जेरबंद केली. या टोळीकडून सात गुन्हे उघड करण्यात आले असून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पंकज ऊर्फ बाबू चीनी धनीराम शिरीष (वय २५, रा. मकरधोकडा), संजय ऊर्फ बदुक तिकमदास कुरे (वय २९, रा. विनोबा भावे नगर), हितेश रमेश डांगे (वय १९, रा. मिनिमाता नगर) आणि आशिष ऊर्फ भांजा उत्तम पटले (वय १९), रा. चिखली वस्ती, कळमना) अशी या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत.
लुटमार, घरफोडी आणि चोरी करणाऱ्या या टोळीने २४ नोव्हेंबरला रात्री ८ च्या सुमारास कळमन्यात लुटमार केली होती. नाशिकच्या जातकमळा जय भवानी मार्गावरील रहिवासी अनिल नानासाहेब सदावर्ते हे सूर्य नगरात एका हॉटेलमध्ये जेवण करायला जात होते. एक्टिवा दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. मारहाण केली आणि मोबाईल तसेच रोख रक्कम लुटून नेली. याच लुटारूंनी काही वेळानंतर चिखलीत ऋषी रामरावजी गावंडे यांच्या जवळचे १३० रुपये आणि मोबाईल हिसकावून नेला. दोन्ही गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज मधून आरोपीच्या दुचाकीचे नंबर मिळाल्याने पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास करत आरोपी पंकज, संजय, हितेश आणि आशिष या चौघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी या दोन्ही गुन्ह्यांची कबुली देतानाच अन्य पाच गुन्ह्यांचीही कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेले मोबाईल रक्कम आणि दुचाकी असा एकूण एक लाख, ४२ हजार, ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-----