नागपूर : मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेले टोळीयुद्ध थांबत नसल्याचे दिसत आहे. मंगळवारी गुन्हेगारांच्या दोन गटांनी ऐकमेकांवर हल्ला चढविला. या घटनेत तीन आरोपी जखमी झाले आहेत. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी एका गटावर अदखलपात्र, तर दुसऱ्या गटाविरुद्ध हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तीन आठवड्यांमध्ये कैद्यांमध्ये मारहाण होण्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे कारागृह अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
पाचपावलीतील गुन्हेगार मो. अमीर पटेल खुनाच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. मंगळवारी दुपारी अमीरवर प्रतिस्पर्धी गुन्हेगार शेख रिजवान शेख मुजीब, प्रज्वल विशाल शेंडे, संतोष अच्छेलाल गोंड यांनी हल्ला केला. त्यांनी लाथाबुक्क्यांनी अमीरला मारहाण केली. या घटनेमुळे अमीर संतापला. अमीरचे साथीदार सौरभ तायवाडे आणि मोनू समुंद्रे यांनी लोखंडाच्या पट्टीने शेख रिजवानवर हल्ला केला. गालावर वार करून रिजवानला जखमी केले. या हल्ल्यादरम्यान लोखंडाच्या पट्टीमुळे मोनू समुंद्रे स्व:तही जखमी झाला. बॅरेक क्रमांक पाचमध्ये घडलेल्या या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली. या घटनेची वाच्यता होऊ नये यासाठी घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, गुन्हेगार जखमी झाल्यामुळे कारागृहात खळबळ उडाल्यामुळे धंतोली पोलिसांना सूचना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलासह पाच कुटुंबीयांचा खून करणाऱ्या क्रूर विवेक पालटकरने २० जूनला राजू वर्मासह तीन गुन्हेगारांना गंभीर जखमी केले होते. विवेकने कपड्यात दगड बांधून तीन कैद्यांवर हल्ला केला होता. तो तिघांचा खून करू इच्छित होता. मागील एका महिन्यात कारागृहात गुन्हेगारांमध्ये मारहाण होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
नागपूर कारागृह चर्चेत
- मागील आठवड्यात एका गँगस्टरच्या साथीदाराने बेदम मारहाण केल्याची चर्चा पसरली होती. त्यापूर्वी कैद्यांनी मोबाईलचा वापर करून एका महिलेला कारागृहातून पार्सल पाठविण्याची चर्चाही झाली होती. नागपूर कारागृह गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी नेहमीच चर्चेत राहिले आहे.
....................